Iran US War Impact : कुवैतमध्ये जीव गमावणाऱ्या २० भारतीयांचे पार्थिव मंगळवारी केरळच्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. मध्य पूर्व आशियात युद्ध सुरू असल्याने याचा परिणाम विमान उड्डाणांवर झाला असून या २० भारतीयांचे मृतदेह मायदेशात पोहचण्यासाठी खूप वेळ लागला आहे. कुवैत एरवेजच्या विशेष विमान KU5632 हे कोलंबोच्या मार्गाने कोचीमध्ये पोहचले. या विमानात एकही प्रवासी नव्हता. हे विमान खास मृतदेह मायदेशात पोहचवण्यासाठीच वापरण्यात आलं.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कुवैतमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये जीव गमावणाऱ्या जवळपास २० भारतीय नागरिकांचे मृतदेह घेऊन मंगळवारी विशेष विमान कोची विमानतळावर दाखल झाले. या घटनेचा युद्धाशी काही संबंध नाहीये. मात्र युद्धामुळे मध्य पूर्व आशियातील विमानसेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे हे मृतदेह मायदेशात पाठवण्यात उशीर झाला आहे.'
विमानतळ प्रशासनानं सांगितलं की विमान लँड करताच २० मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मृत व्यक्तींमधील अधिक लोकं ही केरळच्या कोझिकोड, अलाप्पुझा आणि कोट्टायम या जिल्ह्यातील आहेत. याचबरोबर काही मृतदेह हे रस्त्याच्या मार्गाने तमिळनाडूमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यासाठी रूग्णवाहिकेची आणि इतर आवश्यक गोष्टींची सोय करण्यात आली आहे.
कुवैतमध्ये अडकलेले भारतीयांचे मृतदेह मायदेशात परत आणण्याचे प्रकरण गेले अनेक दिवस प्रलंबित होते. मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धामुळं कुवैतमधून येणाऱ्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. यामुळं हे मृतदेह भारतात येण्यास विलंब झाला आहे. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आता हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहेत.