Kota ICICI Bank woman Manager Customer FD Misuse Stock Market Loss
कोटा (राजस्थान) : बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित असतील, असा प्रत्येक ग्राहकाचा विश्वास असतो. मात्र राजस्थानातील कोटा येथील आयसीआयसीआय बँकेतील एका महिला अधिकाऱ्याने ग्राहकांच्या या विश्वासाचा घोर गैरफायदा घेत, तब्बल 4.58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साक्षी गुप्ता असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. ती आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदावर कार्यरत होती. तिला पपोलिसांनी अटक केली आहे.
बँकेतील विविध FD मधून तीने सुमारे 41 खात्यांमधून हे पैसे परस्पर काढले. आणि ते शेअर बाजारात लावले. पण त्यातही तिचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, 2020 ते 2023 या कालावधीत साक्षी गुप्ता हीने 'यूजर FD लिंक'चा गैरवापर करून 41 ग्राहकांच्या 110 खात्यांतून हे पैसे परस्पर काढले. या रकमेस शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचा तिचा हेतू होता. मात्र, शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्यानंतर ती ही रक्कम परत करू शकली नाही.
साक्षी गुप्ताने फसवणुकीसाठी ग्राहकांच्या खात्यांशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलले व त्याऐवजी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर जोडले. त्यामुळे मूळ खातेधारकांना व्यवहाराबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. इतकेच नव्हे, तर OTP यंत्रणाही आपल्या संगणकावर सेट करून तिने OTP स्वत:कडे घेतले, असे तपास अधिकारी इब्राहीम खान यांनी सांगितले.
एका ग्राहकाने आपल्या FD च्या चौकशीसाठी बँकेत येऊन माहिती घेतल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी साक्षी गुप्ताला तिच्या बहिणीच्या लग्नात येऊन अटक केली असून, सध्या साक्षी गुप्ताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ICICI बँकेने अद्याप याबाबत अधिकृत निवेदन केलेले नाही. मात्र, बँकेतील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांचं नुकसान झालं आहे त्या ग्राहकांना भरपाई दिली जाईल, असे संकेत मिळाले आहेत.
या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. "आम्ही पैसे बँकेत ठेवतो कारण तिथे ते सुरक्षित असतात, पण आता तिथेही धोका वाटतो. मग पैसे ठेवायचे तरी कुठे?" असा प्रश्न एका ग्राहक महावीर प्रसाद यांनी उपस्थित केला.