Kolkata Sairang Express Video Pudhari
राष्ट्रीय

Kolkata Sairang Express Video: ब्रेक फेल... रेल्वेचा भीषण अपघात! एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले; लोको पायलटचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Kolkata Sairang Express Derailment Locomotive Pilot Video: आसाममधील कामरूप जिल्ह्यातील डिगारू रेल्वे स्थानकाजवळ कोलकाता-सैरंग एक्स्प्रेसचे इंजिन आणि पाच डबे असे एकूण सहा डबे रुळावरून घसरले.

Rahul Shelke

Kolkata Sairang Express Derailment Locomotive Pilot Video: आसाममध्ये आज बुधवारी सकाळी रेल्वेचा मोठा अपघात झाला. कामरूप (मेट्रो) जिल्ह्यातील डिगारू रेल्वे स्थानकाजवळ कोलकाता-सैरंग एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले.

सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. दरम्यान, या अपघाताशी संबंधित लोको पायलटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता-सैरंग एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १३१२५) बुधवारी सकाळी डिगारू रेल्वे स्थानकावरून जात असताना तिचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. त्यामुळे एकूण सहा डबे रुळावरून खाली आले. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि मदत-बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नव्हती. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. तसेच प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. मात्र, काही प्रवासी जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा घटनाक्रम

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका स्थानिक नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे ठिकाण डिगारू रेल्वे स्थानकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे.

हा नागरिक सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडला होता. त्याचवेळी त्याला रेल्वे अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचल्यानंतर त्याला रेल्वेचे सहा डबे रुळावरून घसरल्याचे दिसले.

या नागरिकाने रेल्वेच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली. अपघाताच्या ठिकाणाजवळ अनेक घरे असल्याचेही त्याने सांगितले. सुदैवाने या घरांमधील नागरिकांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्याने म्हटले.

रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच रेल्वे इंजिन आणि डब्यांची नियमित तपासणी केली जाते की नाही, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या अपघातासाठी जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

यापूर्वीही रेल्वे अपघातांच्या घटना

गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांच्या इतर घटनाही समोर आल्या आहेत. गुजरातमध्ये दाहोदहून जाकोटच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे दोन चाकं धेडेला परिसरात रुळावरून घसरले होते. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

तामिळनाडूमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. जोलारपेट्टई रेल्वे स्थानकाच्या यार्डमधून सात रिकामे डबे इंजिनशिवाय पुढे निघाले. हे डबे जवळपास सहा किलोमीटरपर्यंत गेले आणि त्यानंतर थामलेरी मुथूर परिसरात रुळावरून घसरले. या घटनेमुळे बंगळुरू आणि चेन्नईदरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आसाममधील ताज्या अपघातामुळे पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT