kerala family death
कोची: केरळमधील कोची येथील वदुथला येथे शनिवारी (दि. २१) सकाळी एका भाड्याच्या घरात तीन मुलांसह कुटुंबातील पाच सदस्य मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी आईने आपल्या मुलांना नवीन कपडे, सूट आणि गॉगल घातले होते.
मृतांमध्ये अश्वथी नायर (वय ३६), तिची आई श्रीकुमारी (वय ५८) आणि अश्वथीची १४, ४ व २ वर्षांची तीन मुले यांचा समावेश आहे. अश्वथी आणि तिच्या आईने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, तर तिन्ही मुलांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला, तेव्हा अश्वथी आणि तिची आई गळफास घेतलेल्या स्थितीत होत्या, तर मुले बेडवर आणि जमिनीवर मृतावस्थेत पडलेली होती. दोन लहान मुलांना बेडवर चादर पांघरून झोपवण्यात आले होते आणि त्यांच्या डोळ्यांवर गॉगल होते. तर मोठ्या मुलाला दुसऱ्या खोलीत जमिनीवर अंथरलेल्या चादरीवर सूट घातलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते. मुलांच्या अंगावर कोणतेही बाह्य जखमेचे निशाण नसल्याने त्यांना विष देऊन मारले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. अश्वथीच्या पतीचे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. मद्यपान आणि कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली होती. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींकडून अश्वथीला सतत दोष दिला जात होता, ज्याचा उल्लेख तिने पत्रात केला आहे. याच मानसिक त्रासातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
तपासात असे समोर आले आहे की, अश्वथीने पतीच्या निधनानंतर महिनाभरातच एक मृत्युपत्र तयार केले होते. त्यामध्ये तिने आपली सर्व मालमत्ता 'प्रोव्हिडन्स होम' नावाच्या संस्थेला देण्याचे लिहिले होते. पोलीस आता या संस्थेचा शोध घेत आहेत. यावरून ती गेल्या अनेक दिवसांपासून आत्महत्येचा विचार करत होती, असे दिसून येते.
हे कुटुंब मूळचे तिरुवनंतपुरमचे असून मोठ्या मुलाच्या उपचारासाठी दोन महिन्यांपूर्वीच कोचीला आले होते. त्यांनी हे घर तात्पुरते भाड्याने घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून घरमालकाच्या फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने संशय बळावला. अखेर घरमालकाच्या नातेवाईकाने अतिरिक्त चावीने घर उघडले असता हा भयानक प्रकार उघडकीस आला. घरात एसी सुरू होता आणि १८ मार्चपासून हे कुटुंब कोणालाही दिसले नव्हते. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.