हायकमांड-अष्टक ठरवणार नवे नेतृत्व 
राष्ट्रीय

Karnataka politics : हायकमांड-अष्टक ठरवणार नवे नेतृत्व

दिल्ली ॲक्शन मोडवर ः शिवकुमार म्हणतात, दिलेला शब्द पाळा!

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : राज्यात नेतृत्व बदलावरून सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अखेर काँग्रेस हायकमांड ॲक्शन मोडवर आले आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हायकमांड नेतृत्वबदलाबाबत योग्य तो निर्णय घेईल. राज्यातील चार प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावून तोडगा काढला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ‌‘दिलेला शब्द पाळा,‌’ असे सूचक वक्तव्य केले आहे.

दिल्लीला रवाना होण्यापूर्वी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राज्यातील घडामोडींची मी स्वतः माहिती देणार असून, त्यानंतर राज्यातील चौघांना चर्चेसाठी दिल्लीला आमंत्रित केले जाणार आहे. मी स्वतः, राहुल गांधी, पक्षाचे संघटन सचिव वेणुगोपाल, राज्यप्रभार रणदीपसिंग सूरजेवाला व राज्यातील चार प्रमुख नेते असे आठ जण आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र चर्चा करून सर्व गोंधळ दूर करू. मी दिल्लीला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला कधी यायचे ते कळविणार आहे. त्यानंतरही बैठक होईल, असेही खर्गे म्हणाले.

दिल्ली बैठकीत सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्यासह गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, सार्वजनिक बांधकाम मंंत्री सतीश जारकीहोळी, वनमंत्री ईश्वर खंड्रे, गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान सहभागी होण्याची शक्यता आहे. ही बैठक शनिवारी, 29 नोव्हेंबररोजी होण्याची शक्यता आहे. त्याचदिवशी सोनिया गांधी दुबईहून दिल्लीला परतणार आहेत.

फोन येताच दिल्लीला

उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी खर्गे यांच्या विधानाचे स्वागत केले असून, हायकंमाड यांचा फोन येताच आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व दोघेही एकत्र दिल्लीला जाऊ, असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही यावर प्रतिक्रिया देत हायकमांडून फोन येताच दिल्लीला जाईन, असे म्हटले आहे.

सिद्धरामय्यांच्या हालचालींत वाढ

मुख्यमंत्री सिद्धरामय्याही आपली खुर्ची अबाधित राखण्यासाठी रणनीती आखण्यात व्यस्त असल्याचे माहिती मिळते आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या निकटवर्तीय आमदार व मंत्र्यांसमवेत डीनर बैठक घेतली आहे. कावेरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मंत्री डॉ. जी. परमेश्वर, डॉ. महादेवप्पा, सतीश जारकीहोळी, भैरती सुरेश, दिनेश गुंडूराव, कृष्ण ब्यारेगौडा, के. व्यंकटेश, जमीर अहमद खान, हरिप्रसाद, के. एन. राजण्णा, पी. एम. अशोक, पोन्नण्णा यांच्यासह अनेकांशी त्यांनी बराच वेळ सल्लामसलत केली आहे.

कोणत्याही कारणास्तव हायकमांड नेतृत्व बदल करणार नाही, याची काळजी घ्या. तसे झाले तर मागासवर्गीय व अल्पसंख्याक घटक काँग्रेस सोडून जातील, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. माजी मंत्री राजण्णा यांनी नेतृत्व बदलाच्या सूत्राला तीव्र विरोध केला असून, काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत यायचा असेल, तर सिद्धरामय्याच मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत, असे म्हटले. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तर शिवकुमार मुख्यमंत्री होण्यास आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अशा बदलांना सहमत नसून यासंदर्भात थेट हायकमांड नेत्यांशी याबद्दल चर्चा करू, असेही ते म्हणाले.

नेतृत्व बदलावर अधिक भाष्य न करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राहुल गांधींनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार मी पुढे जात असून जर मला हायकमांडने बोलावले, तर मी दिल्लीला जाईन; पण कोणत्याही कारणास्तव स्वतःहून दिल्लीला जाणार नाही. तुम्हाला जाण्याची गरज असेल, तेव्हा मी सांगेन मात्र या विषयावर कोणताही निर्णय घेऊ नका.

कोणताही फॉर्म्युला नाही : यतिंद्र

म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना विधान परिषद सदस्य व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले, माझ्या वडिलांवर कोणतेही आरोप नाहीत. ते भ्रष्टाचाराला जागा न देता राज्य करत असताना, त्यांना पदावरून का काढून टाकले जाईल? तेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. तरीही काहीजण यावर चर्चा चर्चा करत आहेत. सरकार स्थापनेदरम्यान कोणताही सत्तावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला नव्हता. वडील किंवा वरिष्ठमंत्र्यांनीही याबद्दल काहीही बोललेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT