

बंगळूर: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी विधानसभेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या विषयावर चर्चा सुरू असताना, शिवकुमार यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' हे गीत गाऊन सभागृहात एकच खळबळ उडवून दिली.
भाजपकडून शिवकुमारांवर गंभीर आरोप
विधानसभेत चिन्नास्वामी स्टेडियममधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा सुरू होती. यावेळी भाजप आमदारांनी शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. "चिन्नास्वामी स्टेडियममधील चेंगराचेंगरीला शिवकुमार यांनीच खतपाणी घातले. आरसीबी संघाच्या आगमनावेळी विमानतळापासून ते स्टेडियमपर्यंत कन्नड ध्वज फडकावून त्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्माद पसरवला," असा दावा भाजपने केला.
'मी माझे काम केले'; शिवकुमारांचे प्रत्युत्तर
भाजपच्या आरोपांना उत्तर देताना शिवकुमार म्हणाले, 'मी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचा (KSCA) सदस्य आहे आणि तेथील सचिव व इतर सर्वजण माझे मित्र आहेत. मी बंगळूरचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मी विमानतळ आणि स्टेडियमवर गेलो होतो. मी कर्नाटकचा ध्वज हातात घेतला, आरसीबी संघाला शुभेच्छा दिल्या आणि कपचे चुंबनही घेतले. मी माझे काम केले.' विरोधी पक्षावर निशाणा साधताना ते पुढे म्हणाले, 'चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी आहे, पण अशा घटना इतर राज्यांतही घडल्या आहेत. गरज पडल्यास इतर राज्यांत घडलेल्या अशा घटनांची संपूर्ण यादीच मी सभागृहात वाचून दाखवेन. मी सुद्धा तुमच्याबद्दल बरेच काही बोलू शकतो,' असा थेट इशाराही त्यांनी दिला.
...जेव्हा शिवकुमारांनी विधानसभेत गायले 'संघगीत'
याच चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी शिवकुमार यांना त्यांच्या 'मी संघाची चड्डी घालतो' या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. यावर शिवकुमार यांनी मिश्किलपणे संघाचे 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' हे प्रार्थनागीत गाऊन दाखवले. विशेष म्हणजे, शिवकुमार जेव्हा हे गीत गात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांना जोरदार दाद दिली, तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मात्र पूर्ण शांतता पसरली होती. यावर भाजप आमदार व्ही. सुनील कुमार यांनी, 'आशा आहे की या ओळी विधानसभेच्या कामकाजातून वगळल्या जाणार नाहीत,' अशी कोपरखळी मारली. शिवकुमार यांनी आपल्या सरकारची पाठराखण करताना सांगितले की, 'अशा घटनांनंतर इतर सरकारांनी कधी जबाबदारी स्वीकारली आहे का? तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या सरकारने चेंगराचेंगरीनंतर तातडीने कारवाई करत पोलीस अधिकारी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यावर कारवाई सुरू केली.'