"कन्नड भाषेचा जन्म हा तामिळ भाषेमधून झाला आहे, असे विधान तुम्ही कोणत्या आधारावर केलं? तुम्ही इतिहासकार आहात का? की भाषाशास्त्रज्ञ?. तुम्ही कोणत्या आधारावर कर्नाटकच्या लोकांच्या भावनांना धक्का दिला? कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला येऊ शकत नाही. या (दाव्या) ला समर्थन देण्यासाठी कुठून साहित्य आणले?," अशी प्रश्नांची सरबत्ती करत कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते कमल हासन ( Kamal Haasan) यांची हजेरी घेतली. पाणी, जमीन आणि भाषा हे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. देशाची फाळणी ही भाषिक आधारावर झाली. कोणत्याही नागरिकाला दुसर्यांचा भावना दुखावण्याचा अधिकार नाही, असे खडेबोलही न्यायमूर्ती नागाप्रसन्ना यांनी यावेळी सुनावले.
कलम हसन यांनी काही दिवसांपूर्वी तमिळ भाषेतूनच कन्नड भाषेची निर्मिती झाली आहे, असे विधान केले होते. यावरुन कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या. त्यांचा आगामी ठग लाईफ या चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका कन्नड संघटनांनी घेतली. तसेच कन्नड भाषेच्या उत्पत्तीबद्दलच्या वक्तव्याबद्दल केलेले विधानावर माफी मागण्यासही त्यांनी नकार दिला होता. यानंतर त्यांनी ठग लाईफ या चित्रपटाच्या प्रदशर्नाला संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती नागाप्रसन्ना यांच्यासमोर सुनावणी झाली.
कन्नड भाषेच्या उत्पत्तीबद्दलच्या वक्तव्याबद्दल केलेले विधानावर माफी मागण्यास नकार देत कमल हासन यांनी स्वत:हून वादाची परिस्थिती निर्माण केली आहे. माफी मागणार नाहीत?, असे ते का म्हणत आहेत. कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या विधानाचे समर्थन देण्यासाठी कुठून साहित्य आहे? कर्नाटकच्या लोकांनी केवळ तुम्ही माफी मागावी एवढीच मागणी केली आहे. तुम्ही कर्नाटकच्या लोकांच्या भावनांना धक्का दिला आहे... कोणत्या आधारावर? तुम्ही इतिहासकार आहात का? की भाषाशास्त्रज्ञ?, असा सवाल करत कोणत्याही नागरिकाला भावना दुखावण्याचा अधिकार नाही. पाणी, जमीन आणि भाषा नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत. या देशाची फाळणी भाषिक आधारावर झाली, असे स्पष्ट करत न्यायाधीश एम नागाप्रसन्ना यांनी हासन यांच्या विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी याचिकाकर्ते कमल हासन यांच्यावतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील ध्यान चिनप्पा म्हणाले की, कमल हासन यांचे विधान न्यायालयाला फक्त एकदाच पाहावे. त्यांनी कोणालाही दुखावण्याच्या हेतून विधान केले नव्हते. यावर न्यायमूर्ती नागाप्रसन्ना म्हणाले की, जर तुम्ही माफी मागणार नसाल तर हा चित्रपट कर्नाटकात का चालवायचा आहे? ते सोडून द्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जनतेच्या भावना दुखावण्यापर्यंत केला जाऊ शकत नाही. तुम्ही माफी मागा, मग काही हरकत नाही. तुम्हाला कर्नाटकातूनही काही कोटी कमवायचे आहेत. तुम्ही व्यावसायिक हितासाठी येथे आहात, तुमच्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे! एका माफीने सर्व काही सोडवले असते. राजगोपाल आचार्य यांनी दशकांपूर्वी अशाच विधानाबद्दल माफी मागितली होती. भाषा ही लोकांशी जोडलेली भावना आहे. ही भावना दुखावण्यासाठी काहीतरी बोलला आहात, असेही न्यायमूर्ती नागाप्रसन्ना यांनी सुनावले. दरम्यान, कमल हासन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप याचिकेवर निर्णय दिलेला नाही. कमल हासन यांनी माफी मागण्याचा विचार करावा, असे खंडपीठाने म्हटले असून सुनावणी दुपारी २.३० वाजतापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.