

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून पतीने जीवन संपवले. पत्नीने त्याला तू जीवन संपव, मी प्रियकरासोबत आनंदाने जीवन जगणे असे म्हटलं होतं;पण एखाद्यास जीवन संपव म्हणणे हे भारतीय दंड संहितेमधील (आयपीसी) कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाही, असे निरीक्षण नोंदवत कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच पतीच्या आत्महत्या प्रकरणी पत्नीला दोष ठरविणारा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला.
'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, पत्नीचे अनैतिक संबंध होते. तिने आपल्या पतीला "तू जीवन संपव, मी प्रियकरासोबत आनंदाने जीवन जगणे." असे म्हटल्याचा आरोप होता. तिच्या चिथावणीखोर बोलण्यामुळे हतबल झालेल्या पतीने आपले जीवन संपवले, असा दावा पतीच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला दोषी ठरवले होते. या प्रकरणी दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणातील दोषींच्या याचिकेवर न्यायमूर्ती शिवशंकर अमरनावर यांनी स्पष्ट केले की, संबंधित महिलेच्या पतीने आत्महत्या केली. महिलेचे नैतिक संबंध हे तिला आयपीसी कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाही. आरोपी महिलेने घटनेच्या काही दिवस आधी पतीशी याचा उल्लेख केा होता; परंतु तिने कोणत्याही चिथावणीखोर शब्द वापरले नव्हते. पतीने आत्महत्या करावी, असा पत्नी आणि तिच्या प्रियकराचा हेतू नव्हता. पत्नीने पतीला आपल्या जीवनातून कायमचे निघून जाण्यास सांगणे, हे चिथावणी देण्यासारखे नाही. पत्नीचे अनैतिक संबंध माहिती झाल्यापासून पती असुरक्षित होता. तिच्यावर नाराजी असल्याने त्याने आत्महत्या केली असावी, पत्नीने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा होत नाही, असा निष्कर्षही न्यायालयाने काढला.
न्यायालयाने म्हटले की, रेकॉर्डवरील पुराव्यावरून हे सिद्ध होणार नाही की, आरोपींनी त्यांच्या कृत्याने पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले. न्यायालयाने याचिकाकर्ती पत्नी आणि तिचा प्रियकर यांना दोषी ठरवणारा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करत दोघांची निर्दोष मुक्तता केली.