Karnataka Govt Suspends Senior IPS Officer Ramchandra Rao: कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी पदावर कार्यरत असलेले रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली. रामचंद्र राव हे कर्नाटकमध्ये डीजीपी (सिव्हिल राइट्स एन्फोर्समेंट) या पदावर कार्यरत होते.
सोमवारी सोशल मीडियावर काही व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये रामचंद्र राव हे वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हे व्हिडीओ समोर येताच प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रकरण गंभीर असल्याने सरकारने तातडीने निलंबनाचा निर्णय घेतला.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रामचंद्र राव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी पूर्णपणे धक्क्यात आहे. हे व्हिडीओ बनावट आहेत. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आजच्या काळात कोणाचाही फेक व्हिडीओ बनवणे शक्य आहे आणि त्यांची प्रतिमा खराब करण्याचे हे कटकारस्थान असू शकते.
रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओ जुने असू शकतात का, असे विचारण्यात आल्यानंतर 1993 बॅचचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी सांगितले की, “जुने असतील तर साधारण आठ वर्षांपूर्वीचे, म्हणजे मी बेलगावीमध्ये पोस्टिंगला असतानाचे असू शकतात.” मात्र तरीही त्यांनी पुन्हा ठामपणे सांगितले की, “या व्हिडीओंचा माझ्याशी काहीही संबंध नाही.”
व्हिडीओ प्रकरण बाहेर आल्यानंतर रामचंद्र राव यांनी राज्याचे गृह मंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भेट होऊ शकली नाही. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे संकेत दिले असून, तपास अहवालानंतर पुढची कारवाई केली जाईल.
या वादावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कडक भूमिका घेतली आहे. “आज सकाळी मला याबाबत माहिती मिळाली. अधिकारी कोणत्याही पदावर असो, कायदा कोणासाठीही वेगळा नाही. प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
रामचंद्र राव हे अभिनेत्री रान्या राव यांचे वडील असल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे. रान्या रावला गोल्ड स्मगलिंगच्या प्रकरणात आधीच अटक झाली होती.
मार्च 2025 मध्ये ती दुबईहून परत येताना तिला पकडण्यात आले होते. तिच्याकडून 14.8 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले होते. या सोन्याची किंमत अंदाजे 12.56 कोटी रुपये असल्याचे सांगितले गेले. यानंतर एजन्सींनी बेंगळुरूतील लवेल रोडवरील निवासस्थानावर छापा टाकून तिथूनही मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त केली होती.
अधिकार्यांनी रान्या रावच्या घरातून 2.06 कोटींचे दागिने आणि 2.67 कोटी रुपये रोख जप्त केल्याचेही समोर आले होते. त्या प्रकरणात रामचंद्र राव यांच्याशी संबंधित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांना काही काळ रजेवर पाठवण्यात आले होते, मात्र काही महिन्यांनी त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.