पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक लोक मला विचारत आहेत की, तुम्ही भारत जोडो यात्रेत का सहभागी झाला आहात. मी एक भारतीय म्हणून येथे आलो आहे. माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. माझी सर्वसमावेशक विचारधारा असून माझा स्वतःचा राजकीय पक्षही आहे. परंतु जेव्हा देशाचा विचार केला जातो, तेव्हा सर्व राजकीय पक्षांच्या रेषा धुसर कराव्या लागतात. मी ती रेषा अस्पष्ट करून येथे आलो आहे, असे अभिनेता कमल हसन (Kamal Hassan) यांनी आज (दि. २४) सांगितले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' आज दिल्लीत दाखल झाली. फरिदाबाद येथून यात्रेने राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करताच दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल चौधरी यांनी बदरपूर सीमेवर गांधी, पक्षाचे इतर नेत्यांचे "राहुल गांधी जिंदाबाद" अशा घोषणा देत यात्रेचे स्वागत केले.
राहुल गांधी यांच्यासोबत अभिनेता, राजकारणी कमल हसन (Kamal Hassan) सहभागी झाले होते. यावेळी लाल किल्ल्यावरून ते जाहीर सभेत बोलत होते. या वेळी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा, भूपिंदर सिंग हुडा, कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या पदयात्रेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या. सोनिया गांधी या यात्रेत सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांनी कर्नाटकात काँग्रेसच्या मेगा फूट मार्चमध्ये सहभाग घेतला होता.
राहुल गांधी म्हणाले की, देशातील सामान्य माणूस आता प्रेमाबाबत बोलू लागला आहे. या यात्रेत प्रत्येक राज्यात लाखो लोक सहभागी झाले आहेत. आम्ही तुमच्या द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहोत, अशा शब्दांत गांधी यां भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचलंत का ?