वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करा: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र | पुढारी

वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करा: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आलेख सौम्य प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना द्रव्यरुपी वैद्यकीय ऑक्सिजनच्या (एलएमओ) नियमित तसेच कार्यात्मक पुरठ्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहेत.

देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी असून स्थिती नियंत्रणात आहे. परंतु, भविष्यातील आव्हानांसाठी अगोदरपासूनच तयार राहावे लागेल. राज्य सरकारांनी त्यामुळे सर्व रुग्णालयांमध्ये नियमित तसेच कार्यात्मक ‘एलएमओ’च्या पुरवठा सुनिश्चित करावा. ऑक्सिजन प्लॅन्ट्सला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नियमित तपासणीसाठी मॉक ड्रिल घेण्याचेही निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

ऑक्सिजन संबंधित मुद्दे आणि आव्हानांचे तत्काळ निराकरणासाठी राज्य स्तरावरील ऑक्सिजन नियंत्रण कक्षांना पुन्हा सुरू करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. दैनंदिन ऑक्सिजनची मागणी तसेच पुरवठ्यावर देखरेख ठेवावी. कोरोनामुळे उद्भवणाऱ्या संभावित आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्यांनी व्हेंटिलेटरची व्यवस्था दुरूस्त करावी. ऑक्सिजन सिलिंडर तसेच त्यांनी रिफिलिंग करीता बॅकअप स्टोरेजची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, चीन, जपान, हाँगकाँग, बँकॉक तसेच दक्षिण कोरियातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधित प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विलगीकरणात पाठवण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button