Kailash Kher:
ग्वाल्हेर: प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि पद्मश्री सन्मानित कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात एक मोठी घटना घडली. ग्वाल्हेरमध्ये त्यांच्या सादरीकरणादरम्यान गर्दी अचानक अनियंत्रित झाली. लोक बॅरिकेड्स तोडून थेट स्टेजच्या दिशेने धावले, ज्यामुळे परिस्थिती बिघडली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, त्यांचा शो मध्येच थांबवावा लागला.
ख्रिसमसच्या मुहूर्तावर ग्वाल्हेरमधील 'मेला मैदान' येथे भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कैलाश खेर आपले सादरीकरण करत होते. शो सुरू असतानाच अचानक प्रेक्षकांनी बॅरिकेड्स तोडले आणि ते स्टेजच्या दिशेने येऊ लागले.
गर्दी थेट स्टेजपर्यंत पोहोचल्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. परिस्थिती पाहून कैलाश खेर यांनी गाणे थांबवले आणि स्टेजवरून प्रेक्षकांना सुनावले, "तुम्ही जनावरांसारखे वागत आहात, कृपया असे करू नका." मात्र, तरीही परिस्थिती सुधारली नाही. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम अर्ध्यातच बंद करावा लागला.
सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि गर्दीला मागे हटवले.
कैलाश खेर यांचा लाईव्ह शो पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सुफी आणि 'इंडियन फोल्क' गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कैलाश खेर यांची ‘तेरी दीवानी’, ‘सइयां’ आणि ‘बम लहरी’ यांसारखी गाणी आजही लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. याच कारणामुळे त्यांच्या लाईव्ह शोला प्रचंड गर्दी होत असते.