Jyoti Waghmare Rajya Sabha oath: राज्यसभेत शपथविधीच्या वेळी एक अनोखा आणि लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळाला. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात राज्यसभेची शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कृतीमुळे संसद भवनात जोरदार चर्चा सुरु आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश त्यांनी दिल्याचं बोललं जात आहे.
शपथविधीदरम्यान ज्योती वाघमारे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाव घेत शपथ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियमांनुसार शपथ घेण्याची पद्धत ठरलेली असल्यामुळे त्यांना मध्येच थांबवण्यात आले. त्यानंतर त्यांनी नियमांनुसार ‘ईश्वर साक्ष’ म्हणून पुन्हा शपथ पूर्ण केली.
शपथ घेतल्यानंतर वाघमारे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “देशाच्या सर्वोच्च सभागृहात शपथ घेतल्यानंतर मी भारतीय संविधानासमोर नतमस्तक आहे. आज माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.” त्यांनी पुढे एकनाथ शिंदे यांचे आभार मानत सांगितले की, साध्या कुटुंबातील मुलीला राज्यसभेत पाठवण्याची संधी दिल्याबद्दल त्या ऋणी आहेत.
महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट मत मांडलं. “महिलांना सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळायला हवे. मात्र, यावेळी कोणतेही आरक्षण नसताना शिवसेनेने माझ्यासारख्या सामान्य पार्श्वभूमीच्या महिलेला राज्यसभेत पाठवले, ही अभिमानाची गोष्ट आहे,” असे त्या म्हणाल्या.