

सोलापूर : राज्यसभेची उमेदवारी मिळणार असे कधीच वाटले नव्हते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पावणेबाराला निरोप आला की तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे आणि तुम्ही खासदार होणार. त्या क्षणी डोळ्यात अश्रू तरळले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या गाडीत बसवून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन गेले. दलित समाजातील सर्वसामान्य महिलेला एवढ्या मोठ्या पदावर केवळ ना. शिंदेच बसवू शकतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानंतर ज्योती वाघमारे या सोलापुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी दै. पुढारीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना बाजूला सारुन ज्योती वाघमारे यांनी राज्यसभा पटकावली. याची चर्चा सध्या राज्यभर गाजत आहे. यातील काही महत्वाच्या घडामोडी ज्योती वाघमारे यांनी सांगितल्या.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, आपण कधीच या पदासाठी इच्छुक नव्हतो. माझे नावही त्यासाठी आलेले नव्हते. राज्यसभेसाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशीही मला काहीच माहित नव्हते. या संपूर्ण प्रकियेबाबत काहीच माहिती नव्हती. मी एका खोलीत बसले असताना निरोप आला की उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यसभेची उमेदवारी तुम्हाला जाहीर केली असून तुम्ही खासदार होणार. त्याक्षणी मला काहीच कळाले नाही. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यानंतर फॉर्म भरण्याची तयारी सुरु झाली. मला कुटुंबाला याची माहिती देण्यासाठी फोन करायला देखील वेळ मिळाला नाही. त्यांनी ही वार्ता माध्यमातून कळाली. फॉर्म भरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे स्वतःच्या गाडीतून मला विधानभवनात घेऊन गेले. तो क्षण माझ्यासाठी अनमोल असल्याचे ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
खरे तर एक सर्वसामान्य कुटुंबातील दलित समाजातून आलेल्या महिलेला एवढे मोठे पद देण्याची ताकद केवळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातच आहे. मला राज्यसभेचे खासदार करण्यासाठी खा. श्रीकांत शिंदे यांनी देखील आग्रह धरला होता. दिग्गज नेत्यांच्यापुढे मी कधीच लॉबिंग केली नाही. माझ्याकडून बोलण्यासाठी देखील कोणी न्ाव्हते त्यामुळे या पदासाठी मी कधीच इच्छा व्यक्त केली नाही. माझे काम, माझे शिक्षण आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे झटण्याची वृत्ती यामुळेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मला या पदावर बसवल्याचे ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
खासदार म्हणून काम करताना मी पक्षाची बाजू दिल्लीत मांडेनच त्यासोबतच सोलापुरातील कष्टकरी, कामगार, महिला यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेन. सोलापुरातील कष्टकरी, विडी कामगार महिलांसाठी केंद्रातून एखादा उद्योग आणता येईल का, येथील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना आणता येईल, युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांच्या रोजगारासाठी काम करणार असल्याचेही ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
आंबेडकरी चळवळीचे बाळकडू घरातूनच
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतले. शिक्षण घेताना अनेक कामेही केली आणि सोबत कुटुंबाला हातभारही लावला. वडिल दलित पँथरचे काम करीत होते. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे बाळकडू घरातूनच मिळाले. महाविद्यालयात असताना आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग सुरु झाला. त्याच बरोबर कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांची जाण आली. एकीकडे आंबेडकरी चळवळीचे काम, दुसरीकडे शिक्षण आणि तिसरीकडे निवेदिका म्हणून काम अशा तिनही आघाड्यांवर एकावेळी लढावे लागले. प्राध्यापक झाल्यावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा येथे व्याख्याने दिली. इंग्रजी विषयात पीएचडी करुन डॉक्टरेट मिळवली. काँग्रसेमध्ये काही काळ काम केले. राजकारणातून विश्रांती घेत महाविद्यालात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 2022 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या चार वर्षात शिवसेनेत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले त्याचे फळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले.