Jyoti Malhotra case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हिसार जिल्हा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, बुधवारी सिव्हिल पोलिस स्टेशन पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात ज्योतीची कसून चौकशी केली. याचा अहवाल पाेलिसांनी आज न्यायालयात सादर केला.
आज (दि.२२ मे) सकाळी ९.३० वाजता हिसार पोलिसांनी ज्योती मल्होत्राला न्यायालयात आणले. तिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यता यावी, या मागणीसाठी सुमारे दीड तास युक्तीवाद झाला. यानंतर ज्योतीच्या पोलीस कोठीडत आणखी ४ दिवसांची वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. आज ज्योतीला न्यायालयात हजर करताना वडील हरीश मल्होत्रा यांना तिला भेटण्याची परवानगी नव्हती.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), गुप्तचर विभाग (आयबी) आणि लष्करी गुप्तचर विभागाने ज्योती मल्होत्राची तिच्या पोलिस कोठडीत तीन दिवस चौकशी केली आहे. यामध्ये सर्व एजन्सींनी आपापल्या पद्धतीने तथ्ये गोळा करून त्यांचे अहवाल तयार केले आहेत. बुधवारी कोणतीही केंद्रीय तपास संस्था चौकशीसाठी आली नाही. यावर सिव्हिल पोलिस स्टेशन पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात ज्योतीची चौकशी केली. तपास अधिकारी निरीक्षक निर्मला यांनी ज्योतीकडून युट्यूबवर व्हिडिओ बनवण्याबद्दल आणि तिच्या तीन पाकिस्तान भेटींबद्दल माहिती घेतली हाेती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर बनवलेल्या व्हिडिओबद्दलही ज्योती यांना प्रश्न विचारण्यात आले हाेते. याचा अहवाल पाेलिसांनी आज न्यायालयात सादर केला.
ज्योतीच्या वतीने खटला लढण्यासाठी अद्याप कोणत्याही वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले की, "माझ्याकडे वकीलांना देण्यासाठी पैसे नाहीत. मला वकील कसा घ्यावा हे माहित नाही. गेल्या पाच दिवसांपासून मीडिया आणि पोलिसांशिवाय कोणीही माझ्या घरी येत नाही."
ज्योती मल्होत्राची वैयक्तिक डायरी पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये तिने पाकिस्तानला केलेल्या प्रवासाच्या तपशीलाची नोंद आहे. ही डायरी तपासात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. यामध्ये अनेक संशयित नोंद असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला १६ मे रोजी हिसारमधील न्यू अग्रसेन एक्स्टेंशन येथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या ११ जणांपैकी ज्योती एक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासात आपली डायरी बरोबर ठेवत असे आणि इंग्रजी तसेच हिंदीत आपल्या अनुभवांची नोंद करत असे. पोलिसांचा विश्वास आहे की ही डायरी तिच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांबाबत व संशयास्पद हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकते.
ज्योती मल्होत्राने दोनदा पाकिस्तानला भेट दिली होती. २०२४ मध्ये जेव्हा ज्योती १० दिवसांसाठी पाकिस्तानला गेली होती, तेव्हा भारतात परतल्यानंतर तिने वैयक्तिक डायरीत सुमारे १०-११ पाने लिहिली असून, त्यात आठ पानांवर इंग्रजीत प्रवासाचे सामान्य निरीक्षण आणि तीन पानांवर पाकिस्तानविषयी हिंदीत लिहिले आहे. त्यात पाकिस्तानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दलही मते लिहिली गेली आहेत. ज्योतीने डायरीत लिहिले आहे की, "माझी १० दिवसांची पाकिस्तान भेट पूर्ण केल्यानंतर, आज मी भारतात परतली आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही, परंतु हृदयातील तक्रारी पुसून टाका. आपण सर्व एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत." त्यांनी पुढे लिहिले की लाहोरला भेट देण्यासाठी दोन दिवस खूप कमी वेळ होता.