

डोंबिवली : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बेसरन पठरावर मंगळवारी (२२ एप्रिल) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता. यामध्ये तिघे जण डोंबिवलीकर असून त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांच्या आठवणी डोंबिवलीकरांच्या स्मरणात राहण्यासाठी पश्चिम डोंबिवलीतील भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदानात स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे.
या संदर्भात भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना तसे पत्र धाडले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप व निःशस्त्र पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून मानवतेला काळिमा फासला आहे. या हल्ल्यात हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या डोंबिवलीकरांसह २७ भारतीय प्राणास मुकले आहेत. अवघ्या डोंबिवलीसह देशासाठी ही घटना अतिशय करूण आणि वेदनादायी आहे. मात्र या दुःखद प्रसंगालाही तिन्ही कुटुंबे अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेली आहेत. या घृणास्पद आणि अमानवी घटनेच्या संदर्भात डोंबिवलीकर नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या परिवाराशी प्रत्येक डोंबिवलीकराचे भावनिक बंध जुळले आहेत. देशासाठी तीन डोंबिवलीकरांनी बलिदान दिल्याची भावना भागशाळा मैदानात त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो डोंबिवलीकरांनी व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने, हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या डोंबिवलीकरांच्या स्मृती भागशाळा मैदानात जपल्या जाव्यात यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने याच मैदानात स्मृतीस्थळ उभारावे, अशी समस्त डोंबिवलीकरांच्या वतीने आमदार रविंद्र चव्हाण यांनी या पत्राद्वारे मागणी केली आहे. या कामासाठी तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन कार्यवाही करावी. तसेच या कामाकरिता १ कोटी २५ लाखांचा निधी भागशाळा मैदान सुधारणा कामासाठी आपल्या निधीतून दिला जाईल, त्यातून स्मृतिस्थळ उभारून कै. हेमंत जोशी, कै. संजय लेले आणि कै. अतुल मोने या डोंबिवलीकरांच्या बलिदानाचा यथोचित गौरव व्हावा, अशीही अपेक्षा आमदार रविंद्र चव्हाण यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर पश्चीम डोंबिवलीतील भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदानामध्ये अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची प्रकिया सुरू झाली आहे. रविवारी (दि.4मे) रोजी स्मृतीस्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून स्मृतीस्थळ उभारण्यासाठी मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तातडीने ठराव तयार करून मंजूर प्रक्रियेमध्ये ठेवला आहे. येत्या ४ मे पर्यंत ठराव मंजूर करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.
डोंबिवलीमध्ये राहणारे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघे पर्यटक कुटुंबीयांसह जम्मू- काश्मीरमध्ये गेले होते. पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले असता त्याठिकाणी २२ एप्रिल रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी या तिघांची हत्या त्यांच्या कुटुंबीयांसमोर केली. तुम्ही मुस्लिम आहात का ? तुम्हाला कलमा येते का ? असे प्रश्न विचारत दहशतवाद्यांनी तिघांवर देखील गोळ्या झाडल्या होत्या.