Javed Akhtar Delimitation Bill Pudhari
राष्ट्रीय

Javed Akhtar Delimitation Bill: कुटुंब नियोजन करणाऱ्या राज्यांना कमी जागा, तर इतरांना जास्त प्रतिनिधित्व? डिलिमिटेशनवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले

Javed Akhtar Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया देताना जावेद अख्तर यांनी कुटुंब नियोजन करणाऱ्या राज्यांना कमी जागा मिळण्याच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केला.

Rahul Shelke

Javed Akhtar Delimitation Bill: मोदी सरकार संसदेत मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशनशी संबंधित विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडली आहे.

ज्या राज्यांनी कुटुंब नियोजनाला प्राधान्य दिले, त्यांना भविष्यात कमी जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले गेले नाही, त्यांना अधिक जागा मिळू शकतात, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

जावेद अख्तर यांनी सांगितले की, डिलिमिटेशनबाबतचा अंतिम आराखडा अद्याप समोर आलेला नाही. ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार, नवीन मतदारसंघ कसे तयार केले जाणार आणि त्यासाठी कोणते निकष लावले जाणार, याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती समोर आल्यानंतरच या विधेयकावर योग्य भूमिका घेता येईल.

यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ज्या भागांनी कुटुंब नियोजनाला प्राधान्य दिले नाही, त्यांना अधिक जागा दिल्या जात आहेत. दुसरीकडे, ज्या भागांनी कुटुंब नियोजनाचा स्वीकार केला आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले, त्यांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत समतोल कसा राखला जाणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

डिलिमिटेशन विधेयकाला कोण पाठिंबा देते आणि कोण विरोध करते, याकडेही आपले लक्ष असल्याचे अख्तर यांनी स्पष्ट केले. केवळ सत्ताधारी पक्षच नव्हे, तर विरोधी पक्षांमधील कोणते नेते या विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीचा डिलिमिटेशन विधेयकाला विरोध

दरम्यान, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. शनिवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विधेयकाला एकत्रितपणे विरोध करण्याचे ठरवण्यात आले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. हे विधेयक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दीर्घकाळ सत्तेत राहण्यासाठी मदत करणारे ठरू शकते, असा आरोप त्यांनी केला. तसेच या विधेयकामुळे देशातील लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाबाबतही खरगे यांनी चिंता व्यक्त केली. या समाजांची लोकसंख्या वाढली असली, तरी त्या प्रमाणात त्यांना लोकसभेत प्रतिनिधित्व मिळेलच असे नाही. त्यामुळे या विधेयकाचा त्यांच्या हितांवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

डीएमके आणि शरद पवारांच्या पक्षाचा पाठिंबा

एकीकडे इंडिया आघाडीने विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली असताना दुसरीकडे डीएमके आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार ए. राजा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खासदारांच्या बैठकीत या विधेयकावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ए. राजा यांच्या म्हणण्यानुसार, सर्व राज्यांमधील लोकसभेच्या सध्याच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला डीएमकेने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विधेयकात डीएमकेच्या काही प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आल्याने पक्षाने ही भूमिका घेतल्याचेही सांगितले जात आहे.

डिलिमिटेशन विधेयकामुळे देशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुटुंब नियोजन, राज्यांचे प्रतिनिधित्व, लोकसंख्येचा आधार आणि महिला आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरून या विधेयकाची चर्चा सुरू आहे. आता संसदेत हे विधेयक मांडल्यानंतर कोणत्या पक्षाची भूमिका काय असणार आणि त्यावरून राजकीय संघर्ष किती तीव्र होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT