Japanese Student Bengaluru Police Chair Theft : इंग्रजी भाषा शिकणे आणि भारत भ्रमण करणे या साध्या उद्देशाने २०१९ जपानी तरुण बंगळुरू येथे आला. मात्र, एका घटनेने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बंगळूरु पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईविरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या या विद्यार्थ्याने स्वतःला अटक करून घेण्यासाठी थेट पोलीस ठाण्यातूनच खुर्ची चोरली. अखेर ७ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर त्याला न्याय मिळाला आहे.
२०१९ मध्ये हिरोतोशी तनाका हा जपानी विद्यार्थी बंगळुरू येथील एका खासगी इंग्रजी अकादमीत दाखल झाला होता. मात्र, वर्ग वारंवार रद्द केले जात असल्याने आणि अभ्यासात अनियमितता असल्याने तो संतापला. यासंदर्भात त्याने अकादमी प्रमुखाकडे स्पष्टीकरण मागितले. दोघांमध्ये वाद झाला. चिथावणी दिल्यामुळे रागाच्या भरात तनाका याने अकादमी प्रमुखाला कानाखाली मारली. या घटनेनंतर आरटी नगर पोलिसांनी तनाकाविरोधात दुखापत करणे आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जामीनपात्र असतानाही पोलिसांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी त्याला अटक करून बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात पाठवले. तब्बल १९ दिवस बेकायदेशीर तुरुंगवास भोगल्यानंतर ११ डिसेंबर रोजी त्याची सुटका झाली.
भाषेची अडचण आणि भारतीय कायदेव्यवस्थेची माहिती नसल्यामुळे तनाकासाठी तुरुंगातील दिवस अत्यंत कठीण होते. त्याला एडीएचडी ('लक्ष केंद्रित न होणे आणि अतिचंचलता') हा आजार असूनही तुरुंगात डॉक्टरांनी त्याला आवश्यक औषधे दिली नाहीत. मात्र, याच काळात ट्रिपल मर्डरच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या 'शंकर' नावाच्या कैद्याशी त्याची मैत्री झाली. शंकरनेच त्याला जामिनाच्या प्रक्रियेत आणि तुरुंगातील कायदेशीर बाबी समजून घेण्यात सर्वात मोठी मदत केली.
तुरुंगातून सुटल्यानंतर एका उपनिरीक्षकाने केस मिटवण्यासाठी त्याच्याकडे लाचेची मागणी केली. याविरोधात तनाकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. २ नोव्हेंबर २०२० रोजी उच्च न्यायालयाने त्याच्यावरील सर्व गुन्हे रद्द केले. मात्र, तनाकाला पोलीस लाचखोरीविरोधात 'कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगा'त लढा सुरू ठेवायचा होता. दरम्यान, त्याचा व्हिसा संपल्याने २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्याला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. भारत न सोडता इथेच राहून कायदेशीर लढा देण्याचा एक अजब मार्ग त्याने शोधला—'स्वतःला पुन्हा अटक करून घेणे!' २८ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री तो जेसी नगर एसीपी कार्यालयात घुसला, तिथून पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची खुर्ची उचलली, तिच्यासोबत सेल्फी काढली आणि ती खुर्ची घरी घेऊन गेला! पोलीस आपल्याला अटक करतील आणि या बहाण्याने भारतात राहता येईल, हाच त्याचा त्यामागील एकमेव हेतू होता.
पुढील काळात तनाकाला जपानला डिपोर्ट (हद्दपार) करण्यात आले. मात्र, त्याचे वकील रोहन कोठारी यांच्यामार्फत न्यायालयीन लढा सुरूच राहिला. अखेर मानवाधिकार आयोगाने पोलिसांची कारवाई बेकायदेशीर ठरवत कर्नाटक सरकारला तनाकाला ७५,०० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर ७५ हजार रुपयांची रक्कम तनाकाला हस्तांतरित करण्यात आली असून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या तनाका जपानमध्ये असून त्याची पत्नी भारतातील ईशान्येकडील (North-East) राज्यातील आहे. हद्दपारीमुळे सध्या त्याच्यावर भारतात येण्यास बंदी (ब्लॅकलिस्ट) आहे. ही बंदी हटवून लवकर पत्नीच्या नातेवाईकांना भेटायला आणि आपला मित्र 'शंकर' याला पुन्हा भेटायला भारतात येण्याची त्याची तीव्र इच्छा तनाकाने व्यक्त केली आहे.