Jammu Kashmir LoC Drone Pudhari
राष्ट्रीय

Jammu kashmir Drone: सीमा रेषेवर पाकिस्तानी ड्रोनच्या घिरट्या, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट' मोडवर; घुसखोरीचा प्रयत्न?

Drone Movement from Pakistan: जम्मू- काश्मीरमधील राजौरी, पूंछ या जिल्ह्यातील सीमा रेषेवर पाकिस्तानमधून आलेले ड्रोन दिसले.

पुढारी डिजिटल टीम

Jammu kashmir LoC Pakistan Drone Movement News

श्रीनगर : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला आठ महिने झाले असतानाच पाकिस्तानने पुन्हा नापाक कृत्य केले. रविवारी संध्याकाळी सीमा रेषेवर पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले ड्रोन दिसले. भारतीय सैन्याने हे ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सीमा रेषेवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. घुसखोरांच्या मदतीसाठी हे ड्रोन पाठवण्यात आले होते का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

जम्मू- काश्मीरमधील राजौरी, पूंछ या जिल्ह्यातील सीमा रेषेवर पाकिस्तानमधून आलेले ड्रोन दिसले. हे ड्रोन काही काळ भारताच्या हद्दीत होते. हा प्रकार लक्षात येताच भारताच्या सुरक्षा दलांनी मशीन गनचा वापर करत ड्रोन पाडण्याचा प्रयत्न देखील केला. यानंतर हे ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत परतले.

कुठे किती वाजता ड्रोन दिसले?

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील गनिया- कलसिया या गावांमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ड्रोन दिसले. याच सुमारास तेरयाथ भागातील खब्बर या गावातही आकाशात ड्रोनसदृश यंत्र दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कालाकोट येथील धर्मसाल येथील स्थानिकांनीही ड्रोन दिसल्याचे सांगितले. तर सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमधील गावात संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास आकाशात ड्रोनसदृश यंत्र घिरट्या घालताना दिसल्याचे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. पूंछ जिल्ह्यातील मानकोट सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळील गावात संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी ड्रोन दिसले.

सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर

भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केल्याचे समजताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. परिसरात कसून शोधमोहीम राबवली जात आहे.

शुक्रवारी देखील सीमा रेषेजवळील एका गावात पाकिस्तानने ड्रोनद्वारे शस्त्रसाठा पाठवल्याचे समोर आले होते. यात दोन पिस्तूल, ग्रेनेडचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर रविवारीही ड्रोन दिसल्याने सीमा रेषेवर सुरक्षा दलांनी गस्त वाढवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT