ISRO satellite launch
दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आज अंतराळ क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून GSLV-F17च्या माध्यमातून अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-05चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
या मोहिमेत GSLV रॉकेटने EOS-05ला अत्यंत अचूकतेने उप-भूस्थिर संक्रमण कक्षेत स्थापित केले. भारताच्या भूभागाचे जवळपास प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करण्याची क्षमता या उपग्रहामुळे वाढणार आहे. सुमारे ३६ हजार किलोमीटर उंचीवरून भारताचे सातत्याने विहंगम निरीक्षण करण्यासाठी EOS-05ची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सीमा तसेच संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे.
इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी मोहिमेच्या यशाची घोषणा करताना आनंद व्यक्त केला. EOS-05ला नियोजित कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. GSLV-F15 रॉकेट मोहिमेचे मिशन संचालक थॉमस कुरियन यांनी सांगितले की, GTO किंवा Sub-GTO कक्षेत GSLVद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला EOS-05 हा आतापर्यंतचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.
“हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. GSLVने आपली १९वी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या मोहिमेत विशिष्ट रचनेचा EOS-05 पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून, तो जवळपास प्रत्यक्ष वेळेत पृथ्वीची छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे,” असे कुरियन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रक्षेपणासाठी काही मिनिटांचाच कालावधी लागतो; मात्र त्या काही मिनिटांच्या यशामागे अनेक महिने आणि वर्षांच्या अथक परिश्रमांचा वाटा असतो.
EOS-05 हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे ३६ हजार किलोमीटर उंचीवरून भारताच्या भूभागाचे सातत्याने विहंगम निरीक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या सीमा आणि संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने या उपग्रहाचे महत्त्व वाढले आहे. GSLV-F17 हे प्रक्षेपण यान ५१.७ मीटर उंच असून त्याचे प्रक्षेपणावेळचे वजन ४२०.५ टन आहे. त्यामुळे भारताच्या कार्यरत प्रक्षेपण यानांपैकी हे एक सर्वांत मोठे यान ठरते.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनीही GSLV-F17 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे कौतुक केले. भारताची अंतराळ क्षेत्रातील क्षमता नव्या उंचीवर पोहोचत असून, जागतिक अंतराळ महासत्ता म्हणून देशाची स्थिती अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी म्हटले.