Kashmir tourism | 10 लाखांवर पर्यटकांची काश्मीरला भेट Pudhari File photo
राष्ट्रीय

Kashmir Tourism 2026 | इराण-इस्रायल युद्धाचा काश्मीरला फटका! दल लेकमधील हाऊसबोट्स ओस, पर्यटकांची पाठ

Kashmir Tourism 2026 | हाऊसबोट्स ओस, पर्यटकांची पाठ; अनेक व्यवसाय ठप्प

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : अनिल साक्षी

इराण-इस्त्रायल युद्धामुळे आणि वाढत्या त्यातील अमेरिकेच्या सहभागामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या या संघर्षाचे पडसाद काश्मीर खोऱ्यातही उमटू लागले आहेत.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन उद्योगाला या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. सध्या दल लेक परिसरातील प्रसिद्ध हाऊसबोट्स ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. मागील वर्षी याच काळात पर्यटकांच्या मोठ्या गर्दीमुळे हाऊसबोट्स ओव्हर-बुक झाल्या होत्या. मात्र, यंदा इंधन दरवाढीमुळे हवाई तिकिटे महाग झाल्याने पर्यटक काश्मीरकडे पाठ फिरवत आहेत.

हॉटेल व्यवसाय अडचणीत

पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक चिंतेत आहेत. श्रीनगरमधील हॉटेल व्यावसायिक सांगतात की, काही प्रमाणात गॅसचा साठा असला तरी पर्यटकच नसतील तर व्यवसाय चालवणे कठीण होणार आहे. स्वयंपाक गॅसच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी सेवा मर्यादित ठेवावी लागत आहे.

वाहतूक क्षेत्रालाही फटका

इंधनदर वाढल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. पेट्रोल-डिझेल आणि विमान इंधनाच्या दरात वाढ झाल्याने जम्मू-काश्मीर सरकारने प्रवासी भाड्यात सुमारे १८ टक्के वाढ केली आहे. परंतु, पर्यटकांची संख्या कमी झाल्याने टॅक्सी चालक आणि ट्रॅव्हल ऑपरेटर यांना याचा फायदा होत नाही.

बुकिंगमध्ये मोठी घट

काश्मीरमध्ये मार्च महिन्यापासून पर्यटन हंगामाला सुरुवात होते आणि वसंत ऋतूमुळे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र, यंदा परिस्थिती उलट आहे. काश्मीर दूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ सुमारे १५ टक्केच बुकिंग झाले आहे. हवाई तिकिटांचे वाढलेले दर आणि गॅसटंचाई यामुळे अनेक पर्यटक आपले आरक्षण रद्द करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT