राष्ट्रीय

IPO News : शेअर बाजारात बहार! २०२६ मध्ये २.५५ लाख कोटींचे IPO येणार, SEBI ची ८८ कंपन्यांना मंजुरी

Share Market : १०४ कंपन्या SEBI च्या मान्यतेच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

2.55 Lakh Crore IPO Expected in 2026 SEBI Approves 88 Companies

मुंबई : शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कंपन्यांमध्ये आयपीओ (Initial Public Offering-IPO) आणण्याची स्पर्धा थांबायला तयार नाही. त्यामुळे वर्ष २०२६ मध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल २.५५ लाख कोटी रुपयांचे आयपीओ दाखल होण्याची जोरदार तयारी सुरू आहे. परिणामी गुंतवणूकदारांसाठी आणि मार्केटसाठी हे वर्ष अत्यंत उत्साहपूर्ण ठरणार असल्याचे बाजार तज्ञांचे मत आहे.

मोठी रक्कम, मोठी संधी

आकडेवारीनुसार, आयपीओच्या माध्यमातून प्रचंड मोठी रक्कम उभी करण्याची शक्यता आहे. या २.५५ लाख कोटींच्या एकूण लक्ष्यापैकी ८८ कंपन्यांना बाजार नियामक सेबी (Securities and Exchange Board of India-SEBI) कडून आधीच १.१६ लाख कोटी उभे करण्याची मंजुरी मिळाली आहे. तर १०४ कंपन्या सुमारे १.४० लाख कोटी उभे करण्यासाठी SEBI च्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. २०२५ प्रमाणेच, २०२६ हे वर्षही आयपीओ मार्केटसाठी अत्यंत उत्साहाचे आणि गजबजलेले राहील असा बाजार तज्ञांचा अंदाज आहे.

विक्रमी वर्षाची परंपरा कायम

यापूर्वी, २०२५ या वर्षात सुमारे १०० कंपन्यांनी मेनबोर्ड आयपीओद्वारे विक्रमी १.७७ लाख कोटी उभे केले होते, जो २०२४ च्या संपूर्ण वर्षाच्या तुलनेत अधिक होता. तसेच, प्रमोटर्स, पीई कंपन्या (Private Equity Firms) आणि व्हेंचर कॅपिटल (Venture Capital) गुंतवणूकदारांनी 'ऑफर फॉर सेल' (OFS) च्या माध्यमातून १.१ लाख कोटींहून अधिक किमतीचे शेअर्स विकले.

कंपन्या आयपीओ का आणत आहेत?

बाजारातील विश्लेषकांच्या मते, कंपन्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जागतिक परिस्थिती बिघडण्यापूर्वीच निधी उभारत आहेत. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs) हे दुय्यम बाजारात (Secondary Market) विक्रमी प्रमाणात भारतीय इक्विटी विकत असूनही, ते आयपीओमध्ये सक्रिय भागीदार म्हणून उत्साहाने सहभागी होत आहेत. या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे, सर्व क्षेत्रांतील आणि मार्केट कॅपच्या कंपन्यांना उच्च मूल्यांकनावर भांडवल उभारणी करण्यास मदत मिळत आहे.

बाजारात लवकरच 'या' कंपन्यांची एन्ट्री

नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, मंगळवारी (९ डिसेंबर) SEBI ने ५ पब्लिक इश्यूला मंजुरी दिली. त्यामुळे आता लवकरच मोलबायो डायग्नोस्टिक्स, लीप इंडिया आणि फूडलिंक एफएंडबी होल्डिंग्स (इंडिया) सह एकूण ५ कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होऊ शकतात. याव्यतिरिक्त, टेक्नोक्राफ्ट वेंचर्स आणि एल्डोरैडो एग्रीटेक यांच्या ड्राफ्ट पेपर्सलाही SEBI ने मंजुरी दिली आहे.

दरम्यान, आइनॉक्स क्लीन एनर्जी आणि स्काय अलॉयज अँड पावर या दोन कंपन्यांनी मात्र त्यांचे आयपीओ पेपर्स परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT