

विधिषा देशपांडे
आरोग्य विमा कंपनी बदलणे म्हणजेच ‘पोर्टिंग’ ही कल्पना आज अनेकांना आकर्षक वाटते. प्रीमियम कमी, सेवा सुधारलेली किंवा कव्हरेज अधिक असेल या अपेक्षेने लोक कंपनी बदलण्याचा निर्णय घेतात. परंतु, फक्त कंपनी बदलल्यानेच काम संपत नाही. कारण, क्लेम मंजूर होईल की नाही, हे अनेक सूक्ष्म बाबींवर अवलंबून असते.
योग्य माहिती, पूर्ण दस्तऐवज आणि अटींची स्पष्ट समज नसल्यास, आपण केलेला विमा क्लेम नाकारला जाण्याची शक्यता प्रचंड असते. विमाधारकांना वाटते की, त्यांनी प्रीमियम भरला म्हणजे त्यांचा क्लेम हमखास मंजूर होईल; पण प्रत्यक्षात तसे नसते. विमा कंपनीकडे नियमांची शिस्तबद्ध चौकट असते. खालील कारणांमुळे अनेक दावे नाकारले जातात.
* विमाधारकाने पूर्वीच्या आजारांविषयी प्रामाणिक माहिती दिली नाही, तर कंपनीला तो धोका वाटतो आणि ती क्लेम नाकारते.
* पोर्टिंगच्या आधी सुरू केलेला उपचार नवीन कंपनी कव्हर करत नाही. कारण, तो जुनी पॉलिसी सुरू असताना झालेला खर्च मानला जातो.
* प्रत्येक विमा कंपनीचे नियम आणि कव्हरेज पॉलिसीनुसार वेगळे असतात. जुन्या कंपनीकडून मिळालेला लाभ नवीन ठिकाणी आपोआप लागू होत नाही.
* नवीन कंपनी तुमच्या आरोग्यस्थितीचे स्वतंत्र मूल्यांकन करते आणि त्यावरूनच कोणता आजार कव्हर करायचा आणि कोणता नाही, याचा निर्णय घेते.
* अपूर्ण रिपोर्टस्, चुकीच्या तारखा किंवा पॉलिसीतील माहितीतील विसंगती यामुळेही क्लेम रिजेक्ट होतो.
प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीमध्ये काही आजारांवर ठरावीक वेटिंग पीरियड (प्रतीक्षा कालावधी) असतो. उदाहरणार्थ, काही आजारांवर तीन वर्षांचा वेटिंग पीरियड असेल, तर त्या काळात त्या आजारासाठी क्लेम मिळत नाही. एखाद्याने दोन वर्षे जुनी पॉलिसी पोर्ट केली, तर नवीन कंपनी बाकीचा एक वर्षाचा कालावधी पुन्हा मोजू शकते. त्यामुळे विमाधारकाने हे आधीच स्पष्ट करून घ्यायला हवे की, जुन्या पॉलिसीतील वेटिंग पीरियड कितपत ट्रान्स्फर होत आहे.
पॉलिसीधारकाचे हक्क
* कोणत्याही सामान्य किंवा विशेष आरोग्य विमा कंपनीकडे पॉलिसी पोर्ट करण्याचा अधिकार मिळतो.
* वैयक्तिक किंवा कुटुंब (फॅमिली फ्लोटर) पॉलिसी पोर्ट करता येते.
* पूर्व-अस्तित्वातील आजारांसाठी प्रतीक्षा कालावधीचा झालेला लाभ नवीन कंपनीला मान्य करावा लागतो.
* नवीन कंपनीला जुन्या पॉलिसीइतकी किंवा त्याहून अधिक विमारक्कम देणे बंधनकारक ठरते.
* पोर्टिंग प्रक्रिया इर्डाने ठरवलेल्या वेळेत दोन्ही कंपन्यांनी पूर्ण करणे आवश्यक असते.
महत्त्वाच्या अटी
* पोर्टिंग फक्तपॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी करता येते.
* प्रीमियम आणि इतर अटी नवीन विमा कंपनीच्या नियमांनुसार असतील.
* नूतनीकरणाच्या किमान 45 दिवस आधी जुन्या कंपनीला पॉलिसी शिफ्टची लेखी विनंती करणे आवश्यक.
* पोर्टिंग सुरू असतानाही पॉलिसी ब्रेक होऊ नये, यासाठी 30 दिवसांचा ग्रेस पीरियड असतो.
इर्डाने एक वेब-आधारित प्रणाली तयार केली आहे, ज्यात व्यक्तींना जारी केलेल्या सर्व आरोग्य विमा पॉलिसींची माहिती उपलब्ध असते. त्यामुळे नवीन विमा कंपनीला तुमच्या आरोग्य विम्याचा इतिहास सहज मिळतो आणि पोर्टिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होते. पण, तरीही काही चुकांमुळे क्लेम नाकारला जाऊ शकतो.
क्लेम नाकारला जाऊ नये, यासाठी काय करावे?
* पोर्टिंग करताना सर्व माहिती प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे द्या.
* जुन्या पॉलिसीची कागदपत्रे, मेडिकल रिपोर्टस् आणि क्लेम हिस्ट्री व्यवस्थित सांभाळा.
* नवीन कंपनीकडून लिखित स्वरूपात विचारणा करा की, कोणते वेटिंग पीरियड ट्रान्स्फर झाले आहेत.
* जर उपचार सुरू असेल किंवा शस्त्रक्रिया नियोजित असेल, तर आधी नवीन कंपनीकडून कव्हरेजची पुष्टी घ्या.
* सर्व संवाद आणि दस्तऐवज स्पष्ट ठेवा, जेणेकरून पुढे गैरसमज होणार नाही.
पोर्टिंग ही सुविधा योग्य वापरली तर ती विमाधारकासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामुळे ग्राहकाला अधिक चांगले कव्हरेज, कमी प्रीमियम आणि उत्तम ग्राहकसेवा मिळू शकते. आरोग्य विमा क्षेत्रातील स्पर्धेमुळे कंपन्यांमध्ये सुधारणा होत राहतात आणि ग्राहकांना पर्याय उपलब्ध होतात. परंतु, या प्रक्रियेत फायदा मिळवण्यासाठी स्पष्टता, पारदर्शकता आणि जागरूकता या तीन गोष्टी अनिवार्य आहेत. चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे आणि नियमांची अज्ञानता या सर्व गोष्टी एकत्र येऊन क्लेम नाकारला जाण्याचे मोठे कारण बनतात.
आरोग्य विमा पोर्टेबिलिटी
आरोग्य विमा पॉलिसी बदलताना पूर्वी पॉलिसीधारकांना एका कंपनीकडून दुसर्या कंपनीकडे पॉलिसी शिफ्ट केल्यास पूर्व-अस्तित्वातील आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी पुन्हा सुरू होई. त्यामुळे वर्षानुवर्षे जमा केलेले फायदे वाया जात. ही अडचण दूर करण्यासाठी इर्डाने आरोग्य विमा पोर्टेबिलिटी ही हक्काची सुविधा दिली आहे. त्यानुसार तुम्ही तुमची पॉलिसी कोणत्याही इतर विमा कंपनीकडे बदलली तरी जुन्या पॉलिसीखाली जमा झालेला प्रतीक्षा कालावधीचा लाभ तुम्हाला ‘क्रेडिट’ म्हणून मिळतो. ही सुविधा फक्तकंपनी बदलताना नव्हे, तर त्याच कंपनीतील एका प्लॅनमधून दुसर्या प्लॅनमध्ये बदल करतानाही लागू होते.