नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशात कोरोना महारोगराईची तिसरी लाट शिखरावर पोहचली आहे. ओमायक्रॉन बाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. या अनुषंगाने वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक २८ फेब्रुवारी पर्यंत स्थगित ( International Flight Ban ) केली आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहतूक आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे डीजीसीए कडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. विविध हवाई मार्गांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परिस्थितीनुसार मंजुरी दिली जाऊ शकते, असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
तत्पूर्वी १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. पंरतु, ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा निर्णय मागे घेण्यात आला. १५ डिसेंबरपासून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू होतील, असा निर्णय २६ नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतला होता.कोरोना संसर्गामुळे भारतात येणारी आणि भारतातून जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे २३ मार्च २०२० पासून बंद आहेत. गेल्या वर्षी जुलैपासून सुमारे २८ देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहे, हे विशेष.
हेही वाचलं का?