Indigo File Photo
राष्ट्रीय

IndiGo Flight Emergency Landing : १७,००० फूट उंचीवर थरार! इंडिगोच्या विमानाला विजेचा तडाखा; लखनौत इमर्जन्सी लँडिंग

वैमानिक आणि सह-वैमानिकाच्या प्रसंगावधानाने वाचले १०४ प्रवाशांचे प्राण; विमानाचे पुढील भाग क्षतिग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

IndiGo flight emergency landing Lucknow : पाटण्याहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामानादरम्यान विजेचा तडाखा बसला. ही घटना सुमारे १७,००० फूट उंचीवर घडली. विजेच्या या तडाख्यामुळे विमानाचा 'नोज' (पुढील भाग) क्षतिग्रस्त झाला. प्रसंगावधान राखून वैमानिकाने विमान लखनौ विमानतळावर यशस्वीपणे उतरवले.

१७,००० फूट उंचीवर थरार...

६E ९२५ क्रमांकाच्या विमानाने पाटणा विमानतळावरून दुपारी ३:१० वाजता उड्डाण केले. हे विमान लखनौला दुपारी ४:२० वाजता पोहोचणार होते. मात्र, खराब हवामानात विमान सुमारे १७,००० फूट उंचीवरून जात असताना ही घटना घडली. उड्डाणादरम्यान विमानावर वीज पडली. यामुळे त्याचा पुढील भाग (नोज) खराब झाला. वीज पडल्यानंतर वैमानिकाने परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळली.

लखनौत इमर्जन्सी लँडिंग

आपत्कालीन परिस्थितीमुळे विमानाचे दुपारी ४:०५ वाजता लखनौ येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लखनौ विमानतळावर सर्व १०४ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. तांत्रिक बिघाडामुळे विमान लखनौ विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले असून, अभियंत्यांचे एक पथक सध्या त्याची तपासणी करत आहे.

इंडिगोने प्रवाशांसाठी केली पर्यायी विमानाची व्यवस्था

पाटण्याहून लखनौला आल्यानंतर, हे विमान ६E ६९६८ या क्रमांकाने अहमदाबादला जाणार होते. मात्र, झालेल्या नुकसानीमुळे इंडिगोने प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली. सर्व प्रवासी संध्याकाळी ६:२२ च्या सुमारास दुसऱ्या विमानाने अहमदाबादसाठी रवाना झाले. सुमारे १७,००० फूट उंचीवर असताना विमानावर वीज पडल्याने नुकसान झाले असले, तरी वैमानिकाने परिस्थिती सावरून विमान लखनौमध्ये सुरक्षितपणे उतरवले. ज्या विमानावर वीज पडली होती, त्याची सध्या तांत्रिक तपासणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT