Indian MALE UAV Drone x
राष्ट्रीय

India MALE drones | स्वदेशी MALE ड्रोनची लष्करात एन्ट्री; अमेरिकन 'Predator'पेक्षा अधिक जलद, स्वस्त आणि स्मार्ट!

India MALE drones | संरक्षण मंत्रालयाची 87 सशस्त्र MALE ड्रोन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी, ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत होणार निर्मिती

Akshay Nirmale

India MALE drones

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या ताफ्यात आता लवकरच स्वदेशी बनावटीचे MALE (Medium Altitude Long Endurance) सशस्त्र ड्रोन दाखल होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने 87 सशस्त्र MALE ड्रोन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यासाठी सुमारे 20,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही खरेदी ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत होणार असून 60 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाईल.

त्यामुळे 2029 नंतरच मिळणाऱ्या अमेरिकेच्या MQ-9B Predator ड्रोनच्या तुलनेत हे स्वदेशी ड्रोन लवकर भारतीय लष्कराच्या वापरात येणार आहेत.

MALE ड्रोन म्हणजे काय?

MALE म्हणजे मध्यम उंचीवर आणि दीर्घ काळपर्यंत उड्डाण करणारे सशस्त्र ड्रोन. हे ड्रोन सुमारे 30,000 ते 35,000 फूट उंचीवर तब्बल 30 तासांहून अधिक काळ हवेत राहू शकतात. हे केवळ निगराणी (surveillance) आणि गुप्तचर माहिती (intelligence) गोळा करत नाहीत, तर आवश्यक तेव्हा अत्यंत अचूक क्षेपणास्त्रांनी हल्लाही करू शकतात.

MALE ड्रोनची गरज का भासली?

मे 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्रॉस-बॉर्डर हल्ले केले. त्यावेळी ‘कॅमिकाझी’ ड्रोन वापरण्यात आले होते. मात्र हे एकवेळ वापराचे ड्रोन असल्याने त्यांचा खर्च अधिक आणि कार्यकाल मर्यादित असतो.

MALE ड्रोन हे याउलट अनेकदा वापरता येतात. लक्ष्यावर अचूक हल्ला करून परत येऊ शकतात आणि दीर्घकाळ निगराणी ठेवू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन ऑपरेशन्ससाठी हे ड्रोन रणनीतिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त ठरतात.

Predator MQ-9B विरुद्ध स्वदेशी MALE ड्रोन

घटक- MQ-9B Predator (अमेरिका) स्वदेशी MALE ड्रोन

श्रेणी- MALE (High Altitude Long Endurance) MALE

उत्पादन- अमेरिका भारत (संयुक्त उपक्रमात)

किंमत- 32,000 कोटी (31 ड्रोन) 20,000 कोटी (87 ड्रोन)

कधी मिळणार- 2029 नंतर लवकरच

स्वदेशी योगदान- नाही किमान 60 टक्के

मुख्य कार्ये- निगराणी, हल्ला, उपग्रह संप्रेषण निगराणी, हल्ला, सीमेजवळ उपयुक्त

ड्रोन कोण तयार करणार?

या ड्रोन प्रकल्पात भारतीय कंपन्या हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड HAL, भारत फोर्ज, L&T, टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि अदानी डिफेन्स यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

याआधी ‘दृष्टी 10 StarLiner’ नावाचे ड्रोन Adani Defence आणि इस्रायली Elbit Systems यांच्या सहकार्याने तयार झाले होते, ज्यात 70 टक्के स्वदेशी योगदान होते.

या नव्या संरक्षण पॅकेजमध्ये आणखी काय?

67,000 कोटींच्या संपूर्ण संरक्षण सुधारणा योजनेंतर्गत पुढील बाबींनाही मंजुरी देण्यात आली आहे-

  • IAF साठी 110 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे – 10,800 कोटी

  • नेव्हीसाठी ब्रह्मोस कंट्रोल सिस्टीम अपग्रेड

  • BMP वाहनांसाठी रात्रीसाठी थर्मल साईट्स – सैन्य वापरासाठी

  • ‘सक्षम’ (Spyder) एअर डिफेन्स सिस्टम अपग्रेड

  • S-400, C-17 आणि C-130J साठी देखभाल करार

भारताचा नवीन रणनैतिक टप्पा

Predator MQ-9B ड्रोन 2029 पासूनच भारताला मिळणार आहेत. मात्र तात्काळ सुरक्षेच्या गरजांनुसार, स्वदेशी MALE ड्रोन तयार करून लवकर तैनात करणे हा भारताचा धोरणात्मक निर्णय आहे.

हे ड्रोन केवळ हल्ल्यासाठी नाही, तर दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, सीमावर्ती भागात गस्त, आणि युद्धाच्या वेळी गुप्त माहिती गोळा करण्यासाठीही अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

या निर्णयामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळणार असून, ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT