

Uddhav Thackeray Delhi visit
नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी बुधवारीच राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी दिल्लीतील प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना राज ठाकरेंसोबत युतीबाबतच्या प्रश्नावर उद्धव यांनी 'युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोन्ही भाऊ सक्षम आहोत, त्यासाठी तिसऱ्याची आवश्यकता नाही,' अशा शब्दात आपले मत व्यक्त केले.
त्यांच्या या मतानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकतर्फी 50 टक्के टॅरिफ लादूनही पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? ट्रम्प आपल्या देशाची थट्टा करत आहेत. मात्र तरीही त्यांना मोदी उत्तर देत नाहीत. देश कोण चालवत आहे?
आपल्या देशाला सक्षम पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज आहे. ते दोघेही मणिपूरला जात नाहीत. मात्र दोघेही प्रचाराला जातात. मोदी-शहा भाजपचे प्रचार मंत्री आहेत. त्यांच्याकडे खंबीर धोरण नाही.
मोदींच्या आगामी चीन दौऱ्यावरही ठाकरेंनी टीका केली. गलवान संघर्षानंतर देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला गेला. चीनविरोधाबाबत मोहिम उघडली गेली. आणि आत्ता त्याच चीनला मोदी भेट देत आहेत. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे. चीनचा दौरा हा मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.
मोदी सरकारला काही नितीमत्ता राहिलेली नाही. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सबंध नको. मग दुबईमध्ये जाऊन क्रिकेट पाहणं हीदेखील देशभक्ती नाही, असा टोलाही त्यांनी अमित शहा यांचे पुत्र आणि आयसीसीचे चेअरमन जय शहा यांना लगावला.
मला राहुल गांधी यांचा फोन आला होता. त्यांनी बोलावलं होतं. आज संसदेच्या पक्षाच्या कार्यालयाला जात आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर चर्चेबाबत बोलेन.
उपराष्ट्रपतीपदासाठी मराठी उमेदवार दिला तर त्यावर तेव्हा ठरवू. एक मुद्दा आहे माजी उपराष्ट्रपती कुठं आहेत? ते कुठं आहेत माहिती नाही त्यामुळे माहिती असतं तर त्यांना भेटलो असतो.
दहाव्या शेड्युल्ड नुसार शिवसेनेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. व्हीव्हीपॅट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वापरले जाणार नाही त्यामुळे माझं मत कुठे आहे ते कसं कळणार? असा सवालही त्यांनी केला.