अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवारी (दि. २२) ४७६ पानी आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२३-२४ संसदेत सादर केला.  Sansad TV
राष्ट्रीय

Economic Survey 2023-24 | भारतीय अर्थव्यवस्था मजबूत! २०२५ मध्ये जीडीपी वाढ ६.५- ७ टक्के राहणार

आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२३-२४ संसदेत सादर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ आधी (Union Budget 2024-25) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवारी (दि. २२) ४७६ पानी आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ (Economic Survey 2023-24) अहवाल संसदेत सादर केला. जग भू-राजकीय आव्हानांचा सामना करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेने लवचिकता दर्शविली आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आणि स्थिर असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणात भारताचा वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर (GDP) २०२४-२५ मध्ये ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही अंदाजित जीडीपी वाढ ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ७ टक्के अंदाजानुसार असल्याचे त्यात म्हटले आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेने जागतिक आव्हाने असूनही आर्थिक वर्ष २०२३ मध्ये घेतलेली गती २०२४ मध्ये कायम ठेवली आहे. "भारताचा जीडीपी २०२४ मध्ये ८.२ टक्क्यांनी वाढला. आर्थिक वर्ष २०२४ च्या चार पैकी तीन तिमाहीत जीडीपी ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. सूक्ष्म आर्थिक घटकांशी संबंधित असलेली मॅक्रोइकॉनॉमिक स्थिरता राखण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे बाह्य आव्हानांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम झाला," असे आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात म्हटले आहे.

युवा बेरोजगारीत घट

कोविड-१९ साथीनंतर वार्षिक बेरोजगारीचा दर कमी होत चालला आहे. युवा बेरोजगारीचा दर २०१७-१८ मधील १७.८ टक्क्यांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये १० टक्क्यांपर्यंत खाली घसरला. कामगार मनुष्यबळात तरुणांचा सहभाग वाढला असल्याचे आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ मध्ये म्हटले आहे.

वित्तीय तुटीत घट

२०२३ मधील अनुकूल वित्तीय कामगिरी, भारताच्या मॅक्रोइकॉनॉमिक स्थिरतेचा आधारस्तंभ म्हणून उदयास आली. केंद्र सरकारची वित्तीय तूट आर्थिक वर्ष २०२३ मधील जीडीपीच्या ६.४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीडीपीच्या ५.६ टक्क्यांपर्यंत खाली आणली गेली आहे, अशी तात्पुरती वास्तविक (PA) आकडेवारी ऑफिस ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स (CGA) द्वारे जारी करण्यात आली आहे," असे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अन्नधान्यांच्या किंमतीत वाढ, कारण काय?

प्रतिकूल हवामानामुळे अन्नधान्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. विशिष्ट पीक रोग, मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे आणि वाहतूक व्यवस्थेतील व्यत्ययामुळे टोमॅटोचे दर वाढले. गेल्या हंगामात झालेल्या पावसामुळे रब्बी कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. तसेच खरीप हंगामातील कांद्याची उशीर झालेली पेरणी, दीर्घकाळ पावसाने दिलेली ओढ आणि इतर देशांच्या व्यापार संबंधित उपायांवर परिणाम झाल्यामुळे कांद्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT