Rudrastra UAV Indian military drones DRDO Indigenous UAV VTOL drone
पोखरण : सोलार डिफेन्स अॅण्ड एअरोस्पेस लिमिटेड (SDAL) या भारतीय कंपनीने विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 'रुद्रास्त्र' या हायब्रिड व्हर्टिकल टेक-ऑफ अॅण्ड लँडिंग (VTOL) क्षमतेच्या मानवरहित विमानाने (UAV) पोखरण फायरिंग रेंजवर भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
यातून रूद्रास्तने अचूक हल्ल्याची क्षमता आणि 170 किमी पेक्षा अधिक कार्यक्षेत्र सिद्ध केले आहे. याचबरोबर ‘भार्गवास्त्र’ या मायक्रो-रॉकेटवर आधारित ड्रोनविरोधी प्रणालीनेही गोपाळपूर येथे यशस्वी चाचणीतून आपली परिणामकारकता दाखवून दिली आहे.
आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही दोन्ही चाचण्या भारतीय लष्करासाठी आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानासाठी निर्णायक ठरत आहेत.
या चाचणीदरम्यान ‘रुद्रास्त्र’ने 50 किलोमीटरहून अधिक मोहिम क्षेत्र व्यापले आणि त्याच वेळी स्थिर रिअल-टाईम व्हिडिओ लिंक राखली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर UAV आपल्या लाँच पॉइंटवर सुरक्षित परतले.
एकूण 170 किलोमीटरहून अधिक अंतर कव्हर करताना, त्याने अंदाजे 1.5 तासांची सहनशक्ती (एंड्युरन्स) दाखवली – ही बाब रणभूमीवरील वापरासाठी लष्कराने ठरवलेल्या महत्त्वपूर्ण निकषांची पूर्तता करणारी आहे.
चाचणीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे अचूक मार्गदर्शन प्रणाली असलेल्या मानवविरोधी (anti-personnel) वॉरहेडचे यशस्वी प्रक्षेपण झाले. मध्यम उंचीवरून टाकण्यात आलेल्या या बॉम्बने कमी उंचीवर हवाई स्फोट (airburst) साधून मोठ्या क्षेत्रावर प्रभावी परिणाम केला.
भारतीय लष्कराने निर्धारित केलेल्या रणनैतिक परिणामकारकतेच्या निकषांची पूर्तता रुद्रास्त्रने केली. ही यशस्वी चाचणी 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत देशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.
या यशाबरोबरच, SDAL ने 'भार्गवास्त्र' या कमी खर्चिक पण प्रभावी ड्रोनविरोधी उपायाचीही यशस्वी चाचणी केली. 13 आणि 14 मे रोजी गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजवर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये, भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स शाखेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या चाचण्यांत एकेरी रॉकेट प्रक्षेपणाचे दोन फेरी आणि दोन रॉकेट्स एकत्र (salvo-mode) डागण्याची एक फेरी झाली. एकूण चारही रॉकेट्सने अपेक्षित कार्यक्षमतेनुसार लक्ष्यांना भेदले. 'भार्गवास्त्र' प्रणाली स्वदेशी डिझाईनवर आधारित असून, मायक्रो-रॉकेट्सच्या माध्यमातून ड्रोन झुंडी नष्ट करण्यात सक्षम आहे.
या दोन्ही घटना भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाला चालना देणारी असून, भविष्यातील युद्धातील नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराच्या सज्जतेत महत्त्वाची भर घालणारी आहे.
भारतात सध्या ड्रोन्स आणि ड्रोनविरोधी (Counter-Drone) यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन, विकास आणि उत्पादन सुरू आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत अनेक स्वदेशी कंपन्या आणि सरकारी संस्था हे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
भारताकडे सध्या DRDO ने विकसित केलेली रुस्तम, तापस-BH, निशांत ही ड्रोन्स आहेत.तर आयडिया फोर्जने विकसित केलेले SWITCH UAV हे ड्रोनदेखील आहे. याचा वापर सामरिक कारणांसाठी, हेरगिरीसाठी केला जात आहे.
भारताकडे भार्गवास्त्र यासह D4, इंद्रजाल, झेनट्रॉन इत्यादी ड्रोनविरोधी यंत्रणा आहेत. सीमारेषा, विमानतळ, VVIP कार्यक्रमात ड्रोन हल्ले रोखण्यासाठी यांचा वापर केला जातो.