

Russia Ukraine war Ukraine civilian drone rewards Drone bounty Anti-drone campaign
किव्ह : रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठा ड्रोन हल्ला चढवला होता. आधी युक्रेनने ड्रोन हल्ल्यात रशियाची 40 हून अधिक विमाने निकामी केली, त्यानंतर रशियाने दोन वेळा युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला चढवला.
युक्रेनने नवीन स्वयंसेवक कार्यक्रमांतर्गत रशियन ड्रोन पाडणाऱ्या नागरिकांना दरमहा 1 लाख ह्रिवनिया (सुमारे ₹2.2 लाख किंवा 2400 डॉलर) देण्याची घोषणा केली आहे. किव्ह पोस्ट या युक्रेनी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
हा उपक्रम संरक्षण मंत्रालयाने सुचवला होता आणि आता मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली आहे. सरकारचे प्रतिनिधी तारास मेलनिचुक यांनी टेलिग्रामवर याची अधिकृत घोषणा केली.
ही योजना स्थानिक प्रशासनाच्या निधीतून राबवली जाणार असून, मार्शल लॉ चालू असताना, कमाल दोन वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे.
ड्रोन्स सध्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रशिया इराणने बनवलेले शाहेद 'कॅमिकाझे' ड्रोन मोठ्या प्रमाणावर वापरत आहे, जे युक्रेनच्या ऊर्जा ग्रीड्स आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करतात.
दुसरीकडे, युक्रेननेही आपला ड्रोन ताफा मोठ्या प्रमाणात विकसित केला आहे. टर्किश 'बैराकटर टीबी2', देशात बनवलेले FPV ड्रोन आणि 'ऑपरेशन स्पायडरवेब'सारख्या एआय-सक्षम ड्रोनद्वारे युक्रेन रशियन तळांवर, इंधन साठवण केंद्रांवर, शस्त्रास्त्र गोदामांवर आणि विमानतळांवर हल्ले करत आहे.
या नवीन ड्रोन संरक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित स्वयंसेवक आणि प्रादेशिक संरक्षण दलाचे सदस्य, ज्यांना ड्रोन ऑपरेशनचा अनुभव आहे, त्यांना सामावून घेतले जाणार आहे.
हे स्वयंसेवक रशियन हवाई हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी शत्रूच्या ड्रोनला शोधणे, माग काढणे आणि त्यांना UAV, बंदुका किंवा वैमानिकांच्या मदतीने पाडणे हे काम करतील.
दरम्यान, रशियाने उत्तर-पूर्व खार्किव शहरावर केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा समावेश होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी AFP वृत्तसंस्थेला दिली. या घटनेनंतर अध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
रशियाने युक्रेनवर दररोज चालणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढवले असून, गेल्या काही आठवड्यांत विक्रमी संख्येने ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले आहेत. रशियाने युद्ध थांबवण्यासाठी काही अटी घातल्या असल्या तरी युक्रेनने त्यांना "अल्टिमेटम" म्हणून नाकारले आहे.
युक्रेनच्या म्हणण्यानुसार, युक्रेनला आपल्या 1200 हून अधिक सैनिकांचे मृतदेह रशियाकडून परत मिळाले आहेत. ही प्रक्रिया दोन्ही देशांदरम्यान मागील आठवड्यात झालेल्या चर्चेचा भाग होती.