Dawood Ibrahim latest news his residence address from Karachi Pakistan disclose
मुंबई : भारताचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार आणि 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे भारत सातत्याने सांगत आला आहे. आता भारताच्या माजी महिला राजनैतिक अधिकारी रुची घनश्याम यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
NDTV च्या ‘क्रिएटर्स मंच’या कार्यक्रमात बोलताना माजी राजदूत रुची घनश्याम म्हणाल्या की, "कराचीतील कुणीही सामान्य माणूसदेखील दाऊद इब्राहिम कुठे राहतो हे सांगू शकतो. आम्ही इस्लामाबादमध्ये असताना, आमचा ड्रायव्हर म्हणाला होता – आधी बेनझीर भुत्तो यांचे घर लागते आणि थोडं पुढे गेलं की दाऊदचं घर लागतं."
रुची घनश्याम या अनेक वर्षे इस्लामाबादमध्ये तैनात होत्या. त्या म्हणाल्या की, पाकिस्तानात दाऊद इब्राहिमचं केवळ एकच घर नाही तर कराचीमध्ये अनेक घरे आहेत. तेव्हा मला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं होतं, पण आता वाटत नाही. कारणखोटं लपवणं हीच पाकिस्तानची खासियत आहे. सर्वांनाच माहिती आहे, पण कोणीही यावर अधिकृत टिप्पणी करत नाही.”
1993 मध्ये मुंबईत झालेल्या बाँबस्फोटांमध्ये 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून अधिक जखमी झाले होते. त्यानंतर दाऊद इब्राहिम भारताचा सर्वात मोठा मोस्ट वाँटेड गुन्हेगार ठरला होता. तो एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवत असून त्यात ड्रग्स, मनी लॉन्डरिंग, खंडणी आणि दहशतवादाला आर्थिक मदत अशा अनेक बेकायदेशीर गोष्टींचा समावेश आहे.
अमेरिका आणि भारताने दाऊदवर अल-कायदा आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याचा आरोपही केला आहे.
भारताकडे दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या शहरात आणि आर्थिक राजधानीत राहत असल्याचे ठोस पुरावे आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही या गोष्टीची पुष्टी केली आहे. 2020 मध्ये पाकिस्तान सरकारने चुकून किंवा दबावाखाली दाऊदच्या कराचीत वास्तव्याची कबुली दिली होती.
तेव्हा दहशतवाद्यांवर निर्बंध जारी केले होते. त्यात दाऊद इब्राहिमचे नाव व कराचीतील ठिकाणांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. त्या अधिसूचनेनुसार, दाऊद कराचीत राहत होता. “व्हाईट हाऊस, साऊदी मशिदीजवळ, क्लिफ्टन” येथे त्याचे निवासस्थान आहे.
तसेच दाऊदच्या इतर मालमत्तांचाही उल्लेख करण्यात आला होता — 'हाऊस नंबर 37, 30 वी स्ट्रीट, डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी, कराची' आणि 'कराचीत नूराबादच्या डोंगराळ भागातील एक आलिशान बंगला' या दाऊदच्या मालमत्ता आहेत.
मात्र, नंतर इस्लामाबादने या पत्त्यांपासून हात झटकत म्हटले की ही माहिती पाकिस्तानकडून अधिकृतरीत्या दिली गेलेली नाही.
घनश्याम म्हणाल्या की, “जेव्हा पाकिस्तानवर FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याचा दबाव आला, तेव्हा त्यांनीच ही माहिती जाहीर केली. पण भारत-पाकिस्तान चर्चा झाली, की पाकिस्तान अधिकृतरित्या हे मान्य करत नाही.”
दाऊद इब्राहिमच्या उपस्थितीबाबतची ही माहिती केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. भारताला न्याय मिळवून देण्यासाठी आणि दहशतवादविरोधी लढ्यात ठोस पावले उचलण्यासाठी या प्रकारच्या उघड कबुल्यांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.