प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari News
राष्ट्रीय

Indian Tourists Missing in Nepal : नेपाळमध्ये सहा भारतीय पर्यटक बेपत्ता, शे-फोक्सुंडो सरोवराकडे ट्रेकिंगदरम्यान घटना

खराब हवामानाचा फटका, बचावकार्य सुरू

पुढारी वृत्तसेवा

Indian Tourists Missing in Nepal : नेपाळमधील सर्वात खोल सरोवर 'शे-फोक्सुंडो' परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेले सहा भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. हिमालयीन भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीनंतर ते बेपत्ता झाले आहेत, असे वृत्त 'एएनआय'ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

हिमालयाच्या दुर्गम भागात हिमवृष्टी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अर्णव' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हिमालयाच्या या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली असून, त्यात हे पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटक डोल्पो बुद्ध गावपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ४ आणि ८ मधून शे-फोक्सुंडो सरोवराच्या दिशेने जात होते. शे-फोक्सुंडो ग्रामपंचायत नोंदणी पास घेताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता.

स्थानिक ग्रामस्थांनी दिला होता धोक्याचा इशारा

धो भागातून फोक्सुंडो तलावाकडे परतत असताना हवामान अत्यंत खराब झाले. स्थानिक ग्रामस्थांनी धोक्याचा इशारा देऊन पुढे न जाण्याचा सल्ला दिला होता, तरीही पर्यटकांनी प्रवास सुरू ठेवल्याचे जिल्हाधिकारी ज्यूनू हमाल यांनी सांगितले. उंच डोंगराळ भागातून परतताना ते बर्फात अडकले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्‍प अन् हवामानाचा अडथळा

नुमला आणि बगला पास या उंच भागांत मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे पर्यटकांशी संपर्क होताना अडथळा निर्माण झाला. शे-फोक्सुंडो ग्रामपंचायतीचे सरपंच धावा समदुक गुरुंग यांनी स्पष्ट केले की, "या खिंडींच्या भागात फोन नेटवर्क नसल्यामुळे पर्यटक नेमके कुठे आहेत, याची माहिती मिळणे कठीण झाले आहे."

शोध आणि बचाव मोहीम सुरू

प्रशासनाने बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु जोरदार बर्फवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे या दुर्गम भागात शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. डोल्पाचे पोलीस उपअधीक्षक अनिल राज गिरी यांनी सांगितले की, ताज्या माहितीनुसार, हे सहा भारतीय पर्यटक अजूनही संपर्काबाहेर आहेत. शोध आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याबाबत संबंधित संस्थेला विनंती करण्यात आली आहे. पर्यटकांचा शोध घेण्यासाठी आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी नेपाळ लष्कराचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटीचा अभाव, दाट बर्फ आणि दुर्गम भूप्रदेशामुळे, पर्यटकांच्या गटाचे नेमके स्थान शोधणे आणि त्यांची प्रकृती जाणून घेणे बचाव पथकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

'अप्पर डोल्पा'मध्ये २४० हून अधिक पर्यटक

जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या माहितीनुसार, २४४ पर्यटक अप्पर डोल्पा भागात पोहोचले आहेत. यामध्ये १४९ नेपाळी नागरिक, सार्क (SAARC) देशांतील ४४ पर्यटक आणि इतर परदेशी देशांतील ५१ पर्यटकांचा समावेश आहे. हवामानाची बिघडती स्थिती पाहता, जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना जोखमीच्या भागांत जाणे टाळून सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT