Canva Image
राष्ट्रीय

Railway Ticket Price Hike : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून भाडेवाढ लागू, पण 'या' प्रवाशांना दरवाढीतून वगळले

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वातानुकूलित (AC) आणि गैर-वातानुकूलित (Non-AC) या दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये भाडेवाढ लागू

पुढारी वृत्तसेवा

भारतीय रेल्वेने प्रवासी भाडेदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही भाडेवाढ मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये लागू होईल. दरम्यान, 1 जुलैपासून रेल्वे मंडळाने या वाढीव दरांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

विविध वर्गांतील भाडेवाढ

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वातानुकूलित (AC) आणि गैर-वातानुकूलित (Non-AC) या दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये भाडेवाढ लागू केली जाईल.

एसी वर्ग : एसी चेअर कार, एसी थ्री टियर, थ्री इकॉनॉमी, एसी टू टियर, एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे.

मेल/एक्सप्रेस (नॉन-एसी) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील गैर-वातानुकूलित डब्यांमध्ये सेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी प्रति किलोमीटर एक पैशाची भाडेवाढ करण्यात आली आहे.

जनरल क्लास : रेल्वेने जनरल डब्यातील सेकंड क्लास सामान्य (Ordinary) प्रवासासाठी 500 किलोमीटरपर्यंत कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. तथापि, 501 ते 1500 किलोमीटरसाठी 5 रुपये, 1501ते 2500 किमीसाठी 10 रुपये आणि 2501 ते 3000 किमीसाठी 15 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तर, फर्स्ट क्लास सामान्य आणि स्लीपर क्लास सामान्यमध्ये प्रति किलोमीटर अर्धा पैसा भाडेवाढ लागू होईल.

लोकल आणि सीझन तिकीटधारकांना दिलासा

रेल्वेने उपनगरीय (लोकल) गाड्या आणि मासिक/त्रैमासिक पास (MST/QST) धारक प्रवाशांना या भाडेवाढीतून वगळले आहे. अधिसूचनेनुसार, उपनगरीय आणि सीझन तिकीट दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या प्रवाशांवर भाडेवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.

सर्व विशेष गाड्यांच्या दरात वाढ

रेल्वेने तेजस, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, गरीब रथ, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस यांसारख्या सर्व विशेष गाड्यांमधील सामान्य सेवा, अनुभूती कोच आणि एसी व्हिस्टाडोम कोचच्या श्रेणी-निहाय मूळ भाड्यात सुधारित दरपत्रकानुसार वाढ केली आहे.

1 जुलैपासून अंमलबजावणी

रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, वाढीव भाडे 1 जुलैपासून लागू केले जाईल. मात्र, ज्या प्रवाशांनी 30 जूनपूर्वी आपले तिकीट आरक्षित केले आहे आणि त्यांचा प्रवास 1 जुलै नंतरचा आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT