प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

Indian Railways NTPC Recruitment : पदवीधरांना करिअरची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेच्या NTPC अंतर्गत ३,५४८ रिक्त जागांची घोषणा

Indian Railways NTPC Recruitment 2026 : भरती मोहिमेत चार प्रमुख पदांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Indian Railways NTPC Recruitment 2026 : भारतीय रेल्वेने 'नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी' (NTPC–पदवीधर) अंतर्गत पदवीधर-स्तरीय ३,५४८ रिक्त जागांची घोषणा केली आहे. रेल्वे भरती मंडळांनी (RRBs) जारी केलेल्या केंद्रीकृत रोजगार अधिसूचने (CEN) क्र. ०६/२०२६ द्वारे, ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, पदवीधरांना भारतीय रेल्वेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या भरती मोहिमेत चार प्रमुख पदांचा समावेश आहे. यामध्ये मुख्य व्यावसायिक आणि तिकीट सुपरवायझर (Chief Commercial Cum Ticket Supervisor), गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager), कनिष्ठ लेखा साहाय्यक आणि टायपिस्ट (Junior Accounts Assistant Cum Typist) तसेच वरिष्ठ लिपिक आणि टायपिस्ट (Senior Clerk Cum Typist) या पदांचा समावेश आहे.

पदांनुसार रिक्त जागांचा तपशील

  • गुड्स ट्रेन मॅनेजर: २,७५० जागा

  • वरिष्ठ लिपिक व टायपिस्ट: ३७१ जागा

  • कनिष्ठ लेखा साहाय्यक व टायपिस्ट: ३०० जागा

  • मुख्य व्यावसायिक व तिकीट सुपरवायझर: १२७ जागा

सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार मूळ वेतन मिळणार

या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार मूळ वेतन मिळणार आहे. मुख्य व्यावसायिक आणि तिकीट सुपरवायझर या पदासाठी पे लेव्हल-६ नुसार दरमहा ३५,४०० रुपये मूळ वेतन निश्चित करण्यात आले आहे. तर इतर तीन पदांसाठी पे लेव्हल-५ नुसार दरमहा २९,२०० रुपये मूळ वेतन असेल. याशिवाय, नियमांनुसार इतर लागू भत्ते आणि सेवा सवलती मिळतील.

अर्ज करण्याची तारीख व वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख: ८ ऑक्टोबर

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

  • परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख: ८ नोव्हेंबर २०२६

  • अर्ज दुरुस्ती (मॉडिफिकेशन) विंडो: ९ ते १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान खुली राहील.

पात्रता आणि वयोमर्यादा

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता असणे अनिवार्य आहे. तसेच पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवून दिलेले नियम लागू राहतील. १ जानेवारी २०२७ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक पदवीधरांनी सविस्तर अधिसूचना वाचून वेळेत अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया आणि विशेष नियम

उमेदवारांची निवड ही प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित परीक्षा (CBT), दुसऱ्या टप्प्यातील CBT, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारावर होईल. दिव्यांग उमेदवारांसाठी नियमानुसार आरक्षणाचे लाभ, वयोमर्यादेत सवलत, तसेच लेखनिक (scribe) आणि भरपाईचा वेळ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

'कॉम्प्युटर-बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट' रद्द

या भरती प्रक्रियेतील CEN क्र. ०६/२०२६ अंतर्गत आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, कनिष्ठ लेखा साहाय्यक व टायपिस्ट आणि वरिष्ठ लिपिक व टायपिस्ट या पदांसाठी 'कॉम्प्युटर-बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट' (CBTST) रद्द करण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना संगणक आणि टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित असून, रुजू झाल्यानंतर नियमांनुसार त्याची पडताळणी केली जाईल. उमेदवारांना सविस्तर अधिसूचना, जागांचे वर्गीकरण, पात्रता निकष आणि भरतीबाबतचे इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी रेल्वे भर्ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT