Krishangi Meshram Youngest Indian-origin solicitor UK
पुढारी ऑनलाई डेस्क : भारतीय वंशाच्या क्रिषांगी मेश्राम हिने केवळ 21 व्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये सॉलिसिटर म्हणून नोंदणी करत एक इतिहास घडवला आहे.
पश्चिम बंगालमधील ISKCON मायापूरच्या आध्यात्मिक वातावरणात वाढलेल्या आणि केवळ 15 व्या वर्षी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या कृष्णांगीने शिक्षण, कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर कायद्याच्या क्षेत्रात ही विक्रमी झेप घेतली आहे. ओपन युनिव्हर्सिटीमधून प्रथम श्रेणीसह पदवी प्राप्त केली आणि आज ती यूकेतील सर्वात तरुण सॉलिसिटर बनली आहे.
सॉलिसिटर (Solicitor) म्हणजे कायद्यानुसार सल्ला देणारा वकिल. विशेषतः इंग्लंड, वेल्स, ऑस्ट्रेलिया आणि इतर काही राष्ट्रांमध्ये हे पद आहे.
जन्म- पश्चिम बंगाल, भारत
शिक्षण- ISKCON इंटरनॅशनल स्कूल, मायापूर
पदवी- LLB (First Class Honours) The Open University यूके
वय- 21 वर्षे
अनुभव- यूके, सिंगापूर, UAE
विशेष रस- फिनटेक, ब्लॉकचेन, AI, खाजगी कायदेसेवा
पश्चिम बंगालमधील मायापूरच्या क्रिषांगी मेश्रान अलीकडील काळातील या पदावर पोहोचलेली सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. क्रिषांगीचे बालपण पश्चिम बंगालमधील ISKCON मायापूर या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात झाले.
तिने 15 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी The Open University (Milton Keynes, UK) येथे कायद्याच्या पदवीसाठी (LLB) प्रवेश घेतला. तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर, अवघ्या 18 व्या वर्षी तिने First Class Honours पदवी प्राप्त केली आणि ओपन युनिव्हर्सिटीच्या इतिहासातील सर्वात तरुण कायदा पदवीधर ठरली.
पदवी मिळवल्यानंतर, 2022 मध्ये क्रिषांगीला एका अंतरराष्ट्रीय कायदासंस्थेत नोकरीची संधी मिळाली. याशिवाय तिने Harvard Online च्या विविध जागतिक अभ्यासक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि सिंगापूरमध्ये व्यावसायिक अनुभव मिळवला.
सध्या ती यूके व यूएई येथे आपली कायदेशीर कारकीर्द विकसित करत असून, तिने फिनटेक, ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसेच विल्स आणि प्रोबेट यांसारख्या खाजगी ग्राहक सेवा क्षेत्रात विशेष रस दाखवला आहे.
क्रिषांगी तिच्या यशाचं श्रेय The Open University ला देते. तिच्या मते, "मी 15 व्या वर्षी कायद्याचे शिक्षण सुरू करू शकले, हीच गोष्ट माझ्या यशाची खरी सुरुवात ठरली. त्या अभ्यासक्रमाने माझ्या कायदा क्षेत्रातील आधारभूत गोष्टी मजबूत केल्या आणि मला या क्षेत्रात खोल रुची निर्माण झाली."
तिचं दीर्घकालीन स्वप्न म्हणजे यूके किंवा यूएईमधील आघाडीच्या कायदासंस्थांमध्ये काम करत, डिजिटल युगातील नव्या कायदेशीर सेवा आणि ग्राहक-केंद्रित सेवा या क्षेत्रात नावलौकिक मिळवणं.
क्रिषांगीच्या या यशाबद्दल The Open University ने तिच्यावर विशेष लेख प्रसिद्ध करत गौरव व्यक्त केला आहे. "Law grad Krishangi makes history once again" या शीर्षकाखाली तिच्या प्रवासाची सविस्तर माहिती दिली आहे.
क्रिषांगी मेश्राम यांची कहाणी ही फक्त शैक्षणिक यशाची नव्हे, तर ध्येयवेड्या मेहनतीची आणि अचूक दिशा मिळाल्यास किती लवकर यश गाठता येते याची प्रेरणादायी कहाणी आहे. भारतातील एक तरुणी आज आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे ही संपूर्ण भारतातील तरुणाईसाठी अभिमानास्पद बाब आहे.