Indian Navy Submarine Deal Project 75I Scorpene Indigenous Submarines Manufacturing AIP Technology Germany TKMS Deal
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार 1.06 लाख कोटींचा पाणबुडी प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. या करारामुळे भारताच्या समुद्री सामर्थ्याला अभूतपूर्व बळ मिळणार असून, पुढील दशकात भारतीय नौदल जागतिक पातळीवर एक बलाढ्य पाणबुडी शक्ती म्हणून उदयास येईल.
या प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट 751 असे आहे. यात स्वदेशी उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीचा संयोग असणार आहे.
या प्रकल्पांतर्गत, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) आणि जर्मनीच्या ThyssenKrupp Marine Systems (TKMS) या कंपनीमध्ये भागीदारी होणार असून, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त HDW क्लास 214 पाणबुडींचे भारतातच उत्पादन होईल.
या पाणबुडींमध्ये अत्याधुनिक Air Independent Propulsion (AIP) प्रणाली बसवली जाणार आहे, जी त्यांना 2 आठवडे पाण्याखाली राहण्याची क्षमता देईल.
पाणबुडीची लांबी: 72 मीटर
वजन: 2000 टन
शस्त्रसज्जता: 8 वेपन ट्यूब्स, 27 कर्मचाऱ्यांचा क्रू
या करारांतर्गत पहिली पाणबुडी 7 वर्षांत तयार होईल. त्यानंतर दरवर्षी एक पाणबुडी नौदलात दाखल केली जाईल. विशेष बाब म्हणजे, पहिल्या पाणबुडीमध्ये 45 टक्के स्थानिक उत्पादन, तर सहाव्या पाणबुडीपर्यंत ते 60 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पासोबतच, सरकार तीन पुढील पिढीच्या स्कॉर्पिन-क्लास पाणबुडींसाठी आणखी रु. 36000 कोटींचा करार मंजूर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये 60 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाणार असून, या पाणबुडींची रचना ब्राझिलच्या नौदलासाठी तयार केलेल्या पाणबुडींशी मिळती-जुळती असेल.
DRDO ने स्वदेशी AIP प्रणाली यशस्वीपणे विकसित केली असून, INS Kalvari मध्ये ती सप्टेंबर 2025 मध्ये बसवली जाणार आहे. या संदर्भात 1990 कोटींचा करार MDL सोबत झाला आहे.
याशिवाय, फ्रान्सच्या Naval Group सोबत 877 कोटींचा करार करून इलेक्ट्रॉनिक हेवीवेट टॉरपीडो प्रणाली स्कॉर्पिन पाणबुडींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकल्पामुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे
AIP प्रणालीमुळे एकट्या 3 लाख मॅन-डेचं काम उपलब्ध होणार
50 हून अधिक भारतीय कंपन्यांचे सहकार्य
70 हून अधिक अभियंत्यांना TKMS कडून प्रशिक्षण
सध्या भारतीय नौदलाकडे 130 पेक्षा अधिक जहाजे आहेत. 2035 पर्यंत 175 जहाजांचे बलाढ्य नौदल उभारण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. सध्या 61 नवीन जहाजांची निर्मिती सुरू आहे.
या प्रकल्पांचा उद्देश केवळ संख्या वाढवणे नसून, हिंदी महासागरात भारताची सामरिक उपस्थिती आणि क्षमता वाढवणे हे आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या नौदल हालचालींचा विचार करता, भारतासाठी हे अत्यावश्यक बनले आहे.