Supriya Sule Pudhari
राष्ट्रीय

Supriya Sule: वैध कागदपत्र, कन्फर्म तिकीट असूनही 10 भारतीयांना इराण विमानतळावर रोखलं, मदतीसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या

Tehran Airport Indian Passengers: तेहरान विमानतळावर तिकीट आणि कागदपत्रं असूनही काही भारतीय नागरिक अडकले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tehran Airport Indian Passengers: खासदार सुप्रिया सुळे यांनी इराणमधील तेहरान विमानतळावर अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांनी या भारतीय प्रवाशांची माहिती सार्वजनिक केली आणि परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने कारवाई करावी, असं आवाहन केलं.

सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही भारतीय नागरिक कागदपत्रं आणि कन्फर्म तिकिटं असूनही तेहरान विमानतळावर अडकले आहेत. हे सर्व प्रवासी महान एयरच्या W5071 या फ्लाइटने २८ एप्रिल २०२६ रोजी भारतात परतणार होते. मात्र त्यांना विमानातून प्रवास करण्यास नकार देण्यात आला आहे.

अडकलेल्या भारतीयांमध्ये दिग्विजय सिंह, जामदार ओंकार प्रशांत, आलोक प्राणेश चंद्रशेखरन, निक्सन विन्सिली जयराज, मथिवानन परशुरामन, तरुण पनवार, विष्णुप्रीथ कृष्णन विनुकुमार, राम गोविंदराज आणि मोहम्मद दिक्षाद यांचा समावेश आहे.

सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे सर्व भारतीय नागरिक सध्या मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्याकडे मर्यादित संपर्क सुविधा असून ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणावं.

या पोस्टमध्ये त्यांनी एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल आणि इराणमधील भारतीय दूतावास यांना टॅग करत मदतीची विनंती केली आहे.

दरम्यान, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रवाशांना बोर्डिंग का नाकारण्यात आलं, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात असून, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इराणमधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. आता परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT