नवी दिल्ली : भारत आंतरराष्ट्रीय कायद्यांवर आधारित सुरक्षित व शाश्वत स्पेस डोमेनचे समर्थन करतो. अंतराळातील शक्यता असीम आहेत आणि आपली जबाबदारी सामूहिक आहे. भविष्याकडे पाहता २०३५ पर्यंत भारतीय स्पेस स्टेशनची स्थापना आणि २०४० पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर पाठवणे हे आमचे लक्ष्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. १०) जगाला भारताच्या चांद्र मोहिमेची माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमधील ‘इंटरनॅशनल स्पेस समिट’ला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, चांद्रयान-३ मुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश बनला आहे.
आदित्य एल-१ सूर्याची रहस्ये उलगडत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे तंत्रज्ञान व भागीदारी भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कामात येत आहे. या जागतिक विश्वासामागे भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञांच्या अनेक पिढ्यांचे समर्पण व कठोर परिश्रम आहेत. रात्रंदिवस काम करून त्यांनी इस्रोची प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, वैज्ञानिक डेटाचा वापर पारदर्शक व प्रामाणिकपणाने सामायिक ध्येयासाठी केला पाहिजे. भारताचा अंतराळ प्रवास याच विचारांचे दर्शन घडवतो. आम्ही फ्रान्स व इतर देशांना भारताच्या पुढच्या पिढीच्या स्पेस रिसर्चमध्ये सहप्रवासी बनण्याचे आवाहन करतो.
१९६० च्या दशकात थुम्बा येथून भारतीय अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासूनच फ्रान्स हा विश्वासू भागीदार राहिला आहे. आज आमचे सहकार्य पृथ्वी निरीक्षण व प्रगत तंत्रज्ञानापर्यंत विस्तारले आहे, जे वैज्ञानिक गुणवत्तेला मानवी उद्देशाशी जोडते.