India ships Strait of Hormuz
नवी दिल्ली : हॉर्मुझतून सामुद्रधुनीतील नाकेबंदी असूनही, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वाधिक जहाजांच्या बाबतीत भारत एक प्रमुख देश म्हणून समोर आला आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून किमान आठ भारतीय जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आपली पकड घट्ट केली आहे. यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. आकडेवारीनुसार, या महत्त्वाच्या जलमार्गावरून जाणाऱ्या मालवाहू जहाजांपैकी ६० टक्के जहाजे एकतर इराणमधून आली होती किंवा इराणच्या दिशेने जात होती.मात्र, ही नाकेबंदी असतानाही भारताने या मार्गाचा प्रभावी वापर केला आहे. युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारताची किमान आठ जहाजे या भागातून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. यामध्ये 'BW TYR' आणि 'BW ELM' या दोन एलपीजी (LPG) वाहक जहाजांचा समावेश असून, त्यांनी सुमारे ९४,००० टन एलपीजी कार्गोची सुरक्षित वाहतूक केली.
भारतीय ध्वज असलेली चार एलपीजी टँकर्स या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गस्थ झाली. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार:
२६ ते २८ मार्च: 'पाईन गॅस' (Pine Gas) आणि 'जग वसंत' (Jag Vasant) ही जहाजे ९२,६१२ टन एलपीजीसह भारतात पोहोचली.
१६-१७ मार्च: त्यापूर्वी 'एमटी शिवालिक' (MT Shivalik) आणि 'एमटी नंदा देवी' (MT Nanda Devi) ९२,७१२ टन एलपीजी घेऊन अनुक्रमे गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरात पोहोचली होती.
१८ मार्च: संयुक्त अरब अमिरातीतून ८०,८८६ टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' (Jag Laadki) हे टँकर मुंद्रा येथे पोहोचले. तसेच, ओमानहून आफ्रिकेकडे गॅसोलीन घेऊन जाणारे 'जग प्रकाश' हे जहाजही सुरक्षितपणे या भागातून बाहेर पडले.
शिवालिक, नंदा देवी, जग लाडकी, पाईन गॅस, जग वसंत, BW Tyr, BW Elm आणि ग्रीन सान्वी. शुक्रवारी रात्री 'ग्रीन सान्वी' (Green Sanvi) या जहाजाने हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली. हे जहाज सुमारे ४६,६५० मेट्रिक टन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) घेऊन जात होते. या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका 'स्टँडबाय' मोडवर होत्या.मध्यपूर्वेतील संघर्षामुळे सुरू असलेल्या सागरी नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकार इराणच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहे.
इराणने आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (IMO) सदस्य देशांना कळवले आहे की, 'बिगर-शत्रू' (Non-hostile) जहाजे इराणच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत असतील, तर त्यांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तेहरानने स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित असलेली किंवा या "आक्रमणात सहभागी असलेल्या" देशांची जहाजे 'निर्दोष' किंवा 'बिगर-शत्रू' श्रेणीत येत नाहीत.
दरम्यान, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ यांनी जागतिक पुरवठा साखळीवर आणखी दबाव आणण्याचे संकेत दिले आहेत. हॉर्मुझनंतर आता 'बाब एल-मंदेब' (Bab el-Mandeb) या दुसऱ्या महत्त्वाच्या सागरी मार्गालाही लक्ष्य केले जाऊ शकते, असे त्यांनी सुचवले आहे.