बालेन (Balen Shah) सरकारने नेपाळमध्‍ये जाणार्‍या भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे.  Pudhari
राष्ट्रीय

India Nepal Border Entry Rules 2026 |नेपाळमध्‍ये ओळखपत्राशिवाय 'नो एन्ट्री'; बालेन सरकारचा भारतीयांसाठी मोठा नियम

India Nepal Border Entry Rules 2026 |नेपाळ प्रशासनाकडून नियमाची कडक अंमलबजवणी सुरु

पुढारी वृत्तसेवा

India Nepal Border Entry Rules 2026

कांठमाडू : नेपाळमधील बालेन (Balen Shah) सरकारने भारतीय नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. आता नेपाळमध्‍ये जाणार्‍या भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच नेपाळमधून भारतात येणाऱ्यांनाही आपले परिचय पत्र दाखवावे लागणार आहे. आधार कार्ड किंवा सरकारने जारी केलेले इतर कोणतेही वैध ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरले जाईल. (Nepal Entry ID Card Mandatory) नेपाळ प्रशासनाने शनिवारपासून (दि. ९ मे) या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

नव्‍या नियमामुळे भारत-नेपाळ सीमेवर दिवसभर प्रवाशांची तारांबळ

नवा नियम लागू झाल्यानंतर शनिवारी जोगबनी (Jogbani Border) येथील भारत-नेपाळ सीमेवर दिवसभर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. ओळखपत्रांच्या सखोल तपासणीमुळे सीमेवर वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोलकाता येथून येणारी ट्रेन जोगबनी स्टेशनवर पोहोचताच मोठ्या संख्येने प्रवासी नेपाळला जाण्यासाठी सीमेवर पोहोचले. मात्र, नेपाळ पोलिसांकडून ओळखपत्र तपासल्यानंतरच लोकांना प्रवेश दिला जात होता. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्र नव्हते, त्यांना सीमेवरूनच परत पाठवण्यात आले.

जमुनहा गावात तणावाचे वातावरण

नेपाळचे प्रमुख जिल्हाधिकारी युवराज कटेल यांनी स्पष्ट केले की, सीमा ओलांडण्यासाठी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. दुसरीकडे, बहराइचला लागून असलेल्या नेपाळच्या सुमारे १७ किलोमीटरच्या सीमा पट्टीत मोठ्या संख्येने मधेशी समुदाय राहतो. नेपाळी क्षेत्रातील जमुनहा गावात या निर्णयामुळे तणावाचे वातावरण असल्याचे समजते. नेपाळी आर्म्ड पोलीस फोर्सचे जवान येण्या-जाणाऱ्यांची चौकशी आणि तपासणीच्या नावाखाली कडक पावले उचलत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

चीनी घुसखोरीच्या शक्यतेने पोलीस आणि SSB अलर्टवर

नेपाळ सीमेवरून चिनी नागरिकांच्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती जिल्ह्यातील पोलीस आणि एसएसबी (SSB) ला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमधील बेतिया, पूर्व चंपारण, सीतामढी, दरभंगा, मधुबनी यांसह उत्तर बिहारमधील इतर जिल्ह्यांतील पोलिसांना भागातील सर्व प्रमुख हॉटेल्स आणि लॉजची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जोगबनी बॉर्डरवरून चिनी नागरिकाला घेतले ताब्‍यात

तीन दिवसांपूर्वी अररियाच्या जोगबनी बॉर्डरवरून भारतात घुसलेल्या एका चिनी नागरिकाला वैध कागदपत्रांशिवाय पकडण्यात आले होते. या घटनेनंतर पोलीस मुख्यालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ४ मे रोजी चीनच्या हुनान प्रांतातील नागरिक झोउ हुआन याने नेपाळी क्रमांकाच्या स्कूटीवरून भारतात प्रवेश केला होता. सीमेजवळच एसएसबी जवानांनी त्याला रोखून धरले आणि स्थानिक पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT