Loose Tablets Rule Pudhari
राष्ट्रीय

Loose Tablets Rule: पूर्ण स्ट्रिपची गरज नाही? सुट्ट्या गोळ्या विक्रीचा नवा नियम येणार; औषध विक्रीत मोठा बदल होणार

Loose Tablets Rule: सरकार सुट्ट्या गोळ्या विक्रीस परवानगी देणारा नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे रुग्णांचा अतिरिक्त खर्च कमी होईल, पण फार्मसी आणि कंपन्यांमध्ये चिंता वाढली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Loose Tablets Rule: भारतात औषध खरेदी करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत रुग्णांना पूर्ण स्ट्रिप (10–15 गोळ्या) घ्यावी लागत होती. डॉक्टरांनी कमी गोळ्या लिहून दिल्या असल्या तरी रुग्णांना पूर्ण गोळ्या घ्याव्या लागत होत्या. पण आता भारताचे औषध नियंत्रक महासंचालक सुट्ट्या किंवा कापलेल्या स्ट्रिपमधून आवश्यक गोळ्या विकण्याचा नियम आणण्याच्या तयारीत आहे.

रुग्णांना दिलासा, अतिरिक्त खर्चाला आळा

सध्या अनेक औषधं 10 किंवा 15 गोळ्यांच्या स्ट्रिपमध्ये येतात. पण डॉक्टरांनी फक्त 5 गोळ्या लिहून दिल्या तरी रुग्णांना पूर्ण स्ट्रिप खरेदी करावी लागते. यामुळे अनावश्यक खर्च (₹5 ते ₹100 पर्यंत) वाढतो आणि उरलेली औषधं वाया जातात. या पार्श्वभूमीवर सुट्ट्या गोळ्या विकण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

मोठ्या उद्योगावर परिणाम

हा निर्णय भारताच्या सुमारे $50 अब्जच्या फार्मा उद्योगावर आणि $20–27 अब्जच्या रिटेल फार्मसी मार्केटवर मोठा परिणाम करू शकतो. रुग्णांच्या तक्रारी वाढल्यामुळे सरकारने हा बदल करण्याचा विचार केला आहे. अनेक रुग्णांना फार्मसी पूर्ण स्ट्रिप घेण्याचा आग्रह करतात, अशा अनेक तक्रारी येत होत्या.

फार्मसी आणि कंपन्यांच्या चिंता

मात्र या निर्णयामुळे काही गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत. फार्मसींच्या मते, जेव्हा स्ट्रिप कापली जाते तेव्हा त्यावरची महत्त्वाची माहिती, जसे की एक्सपायरी डेट, बॅच नंबर, औषधाचं नाव, कळत नाही. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. Apollo Pharmacy आणि Tata 1mg सारख्या मोठ्या चेननेही या अंमलबजावणीबाबत शंका व्यक्त केल्या आहेत.

तज्ज्ञांचा इशारा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय रुग्णांसाठी फायदेशीर असला तरी तो काळजीपूर्वक राबवणे गरजेचे आहे. सुट्ट्या औषधांवर विश्वासाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच चुकीच्या डोसचा धोका आणि औषधांचा ट्रॅक (traceability) ठेवण्यात अडचणी येऊ शकतात.

उत्पादकांची भूमिका महत्त्वाची

फार्मा कंपन्यांनीही यामध्ये बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या अँटीबायोटिकचा कोर्स 5 दिवसांचा असेल, तर स्ट्रिपमध्ये 10 गोळ्या असाव्यात 15 नव्हे. यामुळे कापण्याची गरजच निर्माण होणार नाही.

पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न

उरलेली औषधं फेकली गेल्यास पर्यावरणावरही परिणाम होतो. तसेच अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर झाल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच तज्ज्ञ राष्ट्रीय पातळीवर एक्सपायर्ड औषधं गोळा करून नष्ट करण्याची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत.

रुग्णांना अनावश्यक खर्चातून दिलासा देणारा हा निर्णय असला तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत काळजीपूर्वक करावी लागणार आहे. सुट्ट्या गोळ्या विक्रीचा नियम लागू झाला, तर भारतातील औषध विक्रीची पूर्ण पद्धत बदलू शकते. पण त्यासाठी सरकार, फार्मसी आणि कंपन्यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT