जनगणनेत पहिल्याच टप्प्यात विचारणार 33 प्रश्न pudhari photo
राष्ट्रीय

India Census first phase : जनगणनेत पहिल्याच टप्प्यात विचारणार 33 प्रश्न

जनगणनेत घराची मालकी, गॅसजोडणी, वीज व्यवस्थेविषयीच्या प्रश्नांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना 33 प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये घराची मालकी, गॅसजोडणी, वीज व्यवस्थेविषयीच्या प्रश्नांचा समावेश आहे. यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची गणना केली जाणार आहे.

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरदरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या मोहिमेंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरांत जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील. घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, विजेची व्यवस्था, सांडपाणी निचरा, शौचालयाची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी आहे का, याचीही नोंद केली जाणार आहे.

आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतो, हेदेखील प्रगणक विचारतील.

जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस नागरिकांना ‌‘स्व-गणना‌’ करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT