Gold Recycling Explainer
नवी दिल्ली : सध्या एका प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रँडची जाहिरातीमध्ये क्रिकेटचा देव, अशी ओळख असणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर झळकला आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून तुमच्याकडे असणारे सोने बदलून घेण्याच्या प्रक्रियेवर आणि ग्राहकांना मिळणाऱ्या खात्रीशीर पारदर्शकतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आता या जाहिराताची चर्चा करण्याचे कारण म्हणजे परदेशातून नवीन सोने आयात करून देशाचा पैसा बाहेर घालवण्यापेक्षा, घरातले तेच 'जूने सोने' पुन्हा चलनात आणण्याची वेळ आली असे आवाहन नुकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारतीय कुटुंबे आणि मंदिरांकडे मिळून सुमारे ३२ हजार टन सोने असल्याचा सरकारचा अंदाज आहे. हेच अथांग 'सुवर्णधन' पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष आवाहनाला महत्त्व आले आहे. जाणून घेवूया पंतप्रधान मोदींच्या आवाहनामुळे परकीय चलनाची बचत कशी होणार? याविषयी...
भारतीयांचे सोन्यावर असलेले प्रेम जगजाहीर आहे. लग्नकार्ये आणि सणांपासून ते वारसाहक्क आणि गुंतवणुकीपर्यंत सोने या धातुला भारतीय घरांमध्ये एक विशेष स्थान आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, भारतीय कुटुंबे आणि मंदिर ट्रस्टकडे एकत्रितपणे सुमारे ३०,००० ते ३२,००० टन सोने (ज्याची किंमत ३.८ ट्रिलियन डॉलर्स आहे) आहे. काही अंदाजांनुसार हा आकडा ३५,००० टनांपर्यंतही असू शकतो. यातील बहुतांश सोने लॉकर्स, कपाटे आणि तिजोऱ्यांमध्ये न वापरलेले पडून आहे. भारतीय दरवर्षी नवीन सोने खरेदी करत असतानाच, देशभरातील घरांमध्ये न वापरलेल्या सोन्याचा एक मोठा साठा पडून आहे. गेल्या महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केवळ नवीन आयातीवर अवलंबून न राहता, घरात पडून असलेल्या सोन्याचे रिसायकलिंग करण्याचे आवाहन केले होते.
सोने खरेदी मागील भारतीय लोकांची मानसिकता महत्त्वाची आहे. यामागे परंपरा आणि विचारसरणी दोन्हीशी थेट संबंध आहे. अडचणीच्या काळातील 'मित्र' अशी या धातूची ओळख आहे. तसेच पिढ्यानपिठ्या सोने साठवण्याची आपल्याला सवय आहे. सोने विकणे समाजात चांगले मानले जात नाही, म्हणूनच जुने आणि निरुपयोगी दागिने वर्षानुवर्षे संदुकीत बंद राहतात; परंतु आता काळ बदलत आहे. आता जेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, तेव्हा लोकांना जाणीव होत आहे की, तिजोरीत पडून राहिलेले हे जुने सोने त्यांचे एखादे मोठे स्वप्न पूर्ण करू शकते.
गोल्ड रिसायकलिंग (सोन्याचा पुनर्वापर) या प्रक्रियेत जुने दागिने, तुटलेले अलंकार, नाणी, सोन्याच्या विटा, औद्योगिक कचरा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून काढलेले सोने गोळा केले जाते आणि रिफायनिंग (शुद्धीकरण) करून त्याचे पुन्हा शुद्ध सोन्यात रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत आधी सोन्याची शुद्धता तपासली जाते. त्यानंतर ते वितळवून, रिफाईन करून उच्च मानकांनुसार (बहुतेकदा ९९.९ टक्के शुद्धतेपर्यंत) शुद्ध केले जाते. त्यानंतर नवीन दागिने, नाणी किंवा बिस्किटे बनवण्यासाठी ते बाजारपेठेत पुन्हा आणले जाते.या प्रक्रियेचा पर्यावरणालाही मोठा फायदा होतो. खाणीतून नवीन सोने काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते आणि त्याचा पर्यावरणावरही गंभीर परिणाम होतो. रिसायकलिंगमुळे नवीन खाणकामाची गरज कमी होते आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्ड रिसायकलिंग (सोन्याचा पुनर्वापर)चे आवाहन का केले, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या आयात बिलात (Import Bill) दडलेले आहे. भारताने आपल्या सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी २०२५-२६ मध्ये अंदाजे तब्बल ७२.४ अब्ज डॉलर्स (सुमारे ६,८९२.४८ अब्ज रुपये) खर्च केले आहेत. आता सरकारची अशी इच्छा आहे की, आपण परदेशातून सोने मागवण्याऐवजी आपल्या घरात पडून राहिलेले सोने वितळवून कामात आणले पाहिजे. यामुळे देशाचा पैसा देशातच राहील आणि आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. याच कारणामुळे सरकार 'गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम' (सोन्याचे मुद्रीकरण योजना) सारख्या योजना राबवत आहे आणि लोकांना याचे महत्त्व पटवून देत आहे.
सोन्याच्या रिसायकलिंगमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला फार काही वेगळे करण्याची गरज नाही. 'तज्ज्ञांच्या मते, भारतातील घरे आणि मंदिरांमधील सोन्याच्या साठ्यापैकी अवघ्या १ टक्का सोन्याचे दरवर्षी रिसायकलिंग झाले, तर सोन्याची आयात सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते.आयात कमी झाल्यामुळे देशाचे स्थूल आर्थिक स्थैर्य मजबूत होईल आणि देशांतर्गत रिफायनिंग व दागिने निर्मिती उद्योगाला मोठी गती मिळणार आहे.
सोने खरेदी -विक्री क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आता कल बदलत आहे. घर खरेदी किंवा उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी भारतीय लोक बऱ्याच काळापासून सोने विकत किंवा बदलत आले आहेत. जुने दागिने देऊन नवीन डिझाईन्स घेण्याची प्रथाही अनेक दशकांपासून आहे. आता बाजारपेठेत आता अनेक सराफ आणि मोठ्या कंपन्या जुने दागिने देऊन नवीन डिझाइनचे दागिने घेण्याची सुविधा देत आहेत. पूर्वी जुने दागिने मोडून नवीन करताना मोठी कपात (घट) केली जायची, पण आता अनेक ठिकाणी कोणतीही कपात न करता नवीन दागिने देण्याच्या ऑफर्स मिळत आहेत. यामुळे ग्राहकांना आपले जुने दागिने देऊन रोख रक्कम किंवा नवीन दागिने मिळवणे सोपे झाले आहे. या सोप्या सुविधांमुळे आता सामान्य माणूसही आपले पडून राहिलेले सोने रोख रकमेत किंवा नवीन दागिन्यांमध्ये बदलण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मतेभारतीय ग्राहक आता सोन्याकडे केवळ एक 'भावनिक वस्तू' म्हणून न पाहता, 'आर्थिक मालमत्ता' म्हणून पाहत असल्याचे चित्र आहे. आता सरकारच्या 'गोल्ड रिसायकलिंग' आग्रहाला कितपत वास्तवात प्रतिसाद मिळणार हे पुढील काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.