

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे रोजी एक वर्ष सोने खरेदी टाळा अशी आवाहन केले होते. त्यास शुक्रवारी दोन आठवडे पूर्ण होत असून, या दोन आठवड्यात देशभरात 2500 कोटी तर मुंबईत 400 आणि राज्यात 100 ते 150 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
सोने विक्रीच होत नसल्याने सराफ व्यावसायिकांनी रोजची सोने खरेदीही बंद केली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे रोजी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन करताना इंधनाचा वापर संयमाने करण्यास सांगितले. विदेशी चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोने खरेदी करु नका, विदेशी प्रवास करू नका, अशी हाकही पंतप्रधानांनी दिली. त्यास मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसते.
कुमार जैन यांनी सांगितले की, मुंबईत अडीच ते तीन लाख कारागिर असून महाराष्ट्रात 5 लाख कारागिर आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक कारागिर हे बंगाली आहेत. ग्राहकांनीच सोने खरेदी थांबवल्याने निम्म्याहून अधिक सुवर्ण कारागिर मुळगावी रवाना झाले आहेत. आज सराफ बाजारात सोन्याचे दागिने घडविण्यासाठी कारागिर शिल्लक नाहीत.
मुंबईतील सराफ व्यापारी एरव्ही दररोज 50 ते 60 टन सोने खरेदी करत होते. ही खरेदी सराफांनी बंद केली आहे. ग्राहकांकडून येणाऱ्या थोड्याफार मोडवर दहा टक्के व्यापार सुरु आहे. नवीन सोने खरेदी मात्र, पूर्णत: ठप्प झाली आहे.
अक्षय तृतीयेला जो व्यापार झाला त्यानंतर सोन्याची चढउतार होऊन सराफ बाजार थंड पडला आहे. गुरुवारी गुरुपुष्यामृतसारखा मुहूर्त होता. सोने 1 लाख 51 हजार रुपये तोळे तर चांदी 2 लाख 62 हजार रुपये किलो असे अलीकडच्या तुलनेत वाजवी दर असूनही ग्राहकांनी सोनेखरेदीकडे पाहिलेदेखील नाही. जी स्थिती मुंबईची तीच ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांत असल्याचे कुमार जैन यांनी सांगितले.