राष्ट्रीय

पंजाब निवडणूक : अजिंक्य नेत्यांमधील सामना

अनुराधा कोरवी

पंजाब वार्तापत्र, पंकज कुमार मिश्रा, चंढीगढ, पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्व मतदारसंघातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सरदार सुखबीर सिंह बादल यांनी त्यांचे मेहुणे सरदार विक्रमसिंह मजिठिया यांना नवज्योतसिंग सिद्धूंविरोधात मैदानात उतरवले आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सिद्धू करीत आहेत.

एसएडीच्या या रणनीतीमुळे सिद्धू त्यांच्याच'गृह मतदार'संघात वेढले गेल्याचे दिसून येत आहे. पंजाबच्या राजकारणात सिद्धू आणि विक्रमसिंह मजिठिया आतापर्यंत अजिंक्य राहिले आहेत. दोघांनाही भक्कम अशी राजकीय पाश्‍वर्र्भूमी आहे. परंतु; उभय नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पंजाबच्या राजकारणात सिद्धू यांना गुरू म्हणून ओळखले जाते, तर मजिठिया यांना 'माझा का जनरल' बोलले जाते.

अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सिद्धूंचे कुटुंबीय 2012 पासून विजयी होत आहे. परंतु; यंदा माझाच्या जनरलचे आव्हान सिद्धूंना तापदायक ठरू शकते. मजिठिया हे अमृतसर पूर्व आणि मजिठा या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत. दोन जागांवरून निवडणूक लढविणारे अकाली दलाचे ते एकमेव नेते आहेत.

एसएडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार सुखबीर सिंह बादल यांनी 26 जानेवारीला मजिठिया यांच्या उमेदवारीची घोषणा करताना थेट सिद्धूंना आव्हान देत त्यांच्याविरोधात माझाचा वाघ मजिठिया निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. सिद्धूंचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा बादल यांनी केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमृतसर लोकसभा मतदारसंघातून सिद्धू यांचे तिकीट कापल्यानंतर दोघांमधील वैर बळावले.

सिद्धू यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली होती. 2004 मध्ये भाजपकडून अमृतसर लोकसभा मतदारसंघातून सिद्धू निवडून आले. परंतु; एका प्रकरणात शिक्षा झाल्याने सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला. या खटल्यामधून दोषमुक्त झाल्यानंतर 2007 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 2007 ते 2017 पर्यंत लागोपाठ दहा वर्षे पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप सत्तेत होता. परंतु; सिद्धू या युतीचे अवघड दुखणे ठरत होते. अशात आता या कट्टर शत्रूंच्या या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'माझाचे जनरल' मजिठिया

विक्रमसिंह मजिठिया यांची पंजाबच्या माझा या क्षेत्रात पकड आहे. अमृतसर जिल्ह्यातील मजिठा मतदारसंघातून त्यांनी 2007, 2012 आणि 2017 मध्ये विजयी 'हॅट्ट्रिक' केली. याच कारणाने एसएडीने मजिठासह अमृतसर पूर्वमधून त्यांना रिंगणात उतरवले. परंतु; सहा हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मजिठिया यांचे नाव समोर आले. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर मजिठियांना तुरुंगात पाठवू, असे वक्तव्य सिद्धू यांनी केले होते. 2017 मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर गतवर्षी मजिठियांवर गुन्हा दाखल झाला. परंतु; अटक झाली नाही. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने 10 जानेवारीला मजिठियांना जामीन दिला. मजिठियांच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यात अडचण येणार नाही.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT