Himachal flood Baby Nikita Survivor x
राष्ट्रीय

Himachal flood Baby Survivor | पुरात आई-वडील, आजी वाहून गेली; 11 महिन्यांची चिमुरडी पाळण्यामुळे बचावली! मंडीतील घटना...

Himachal flood Baby Survivor | हिमाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाचा कहर; 72 बळी, बचावकार्य जोरात

Akshay Nirmale

Himachal flood 11 Month Baby Nikita Survivor

मंडी : हिमाचल प्रदेश राज्य सध्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सलग पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन, पूर, रस्ते बंद होणे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

राज्य आपत्ती निवारण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 20 जूनपासून आतापर्यंत किमान 72 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. शेकडो लोक बेघर झाले असून, बचाव आणि पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीकाळात मंडी येथे एका कुटुंबातील आई-वडील, आजी वाहून गेली पण 11 महिन्यांची निकिता नावाचे चिमुरडे बाळ मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले आहे.

कुटुंबाला पुराचा तडाखा, पण वाचली 'निकिता'

हिमाचलमधील या संकटकाळात मानवी धैर्य, संकटाशी लढण्याची ताकद आणि निसर्गातील काही आश्चर्यकारक घटना समोर येत आहेत. अशाच एका घटनेने संपूर्ण जिल्हा थक्क झाला आहे.

30 जूनच्या रात्री, मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा क्षेत्राला मुसळधार पावसाने पूर्णतः झोडपून काढले. एका घरात झोपलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. अचानक आलेल्या पुरामुळे घराच्या मागील बाजूचे बांध फुटले आणि नदीचे पाणी थेट घरात शिरले.

यात 11 महिन्यांची चिमुरडी निकिताचे आई-वडील रमेश आणि राधा, तसेच तिची आजी पूर्णूदेवी हे तिघेही वाहून गेले. मात्र, निकिता ही 11 महिन्यांची चिमुरडी अद्भुतरित्या बचावली.

पाळण्यामुळे बचावली निकिता

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निकिता ज्या पाळण्यात झोपली होती तो पाळणा पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही वेळ वाहत गेला, पण नंतर एका कोपऱ्यात अडकून राहिला.

जेव्हा बचाव पथक त्या भागात पोहोचले, तेव्हा त्या ढिगाऱ्याच्या खाली निकिता पाळण्यात सुरक्षितरित्या आढळून आली. ती थोडीशी घाबरलेली होती, पण सुखरूप होती. ती कोणत्याही प्रकारे जखमी झालेली नव्हती.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कडेवर खेळली निकिता...

या घटनेची माहिती मिळाल्यावर, गोहऱच्या एसडीएम (अतिरिक्त जबाबदारी) स्मृतिका नेगी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी स्वतः बाळाला उचलून घेतले. दरम्यान, 11 महिन्यांचे निकीता नावाचे हे बाळ अजूनही या धक्क्यापासून अनभिज्ञ आहे.

निकीता उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कडेवर बसून हसत आणि खेळताना दिसून आली. त्या दृश्याने सर्वांचेच डोळे पाणावले.

सध्या मावशीच्या ताब्यात

बचावानंतर निकिताला तात्पुरत्या स्वरूपात तिच्या मावशीच्या (आईच्या बहिणीच्या) ताब्यात देण्यात आले आहे. तिच्या पुढील संगोपनासाठी स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदतीचा शब्द दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

संपूर्ण राज्य आणि देशभरातून निकिता बाळाला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. हिमाचलमधील अशा या कठीण काळात ही घटना एक आशेचा झोत बनून उभी आहे.

हिमाचलमध्ये सध्या परिस्थिती काय?

  • येथे अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत.

  • 20 जूनपासून आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू

  • 200 हून अधिक रस्ते बंद आहेत.

  • हिमाचल सरकारने राज्यात 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

  • लष्कर, NDRF आणि स्थानिक प्रशासन संयुक्तपणे मदतकार्य करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT