आयआयटी दिल्लीच्या पदवीधराने १७ लाखांच्‍या नोकरी सोडत कार्पोरेट बॅकिंग सेक्‍टरमधील कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. pudhari
राष्ट्रीय

IIT Delhi Graduateने का नाकारली १७ लाखांची नोकरी? इन्स्टा पोस्टमध्ये मांडली ‘Toxic’ वर्क कल्चरची व्यथा

Toxic Corporate Culture | इन्‍स्‍टा पोस्ट करत कॉर्पोरेट बँकिंग सेक्टरमधील कार्यपद्धतीवर ठेवले बोट

पुढारी वृत्तसेवा

IIT Delhi Graduate Rejects ₹17 Lakh Job Over Toxic Work Culture

नवी दिल्‍ली : आयआयटी दिल्लीच्या एका २४ वर्षीय तरुणाने कॉर्पोरेट बँकिंगमधील आपली भरघोस पगाराची नोकरी का सोडली, याची व्यथा मांडली आहे. कामाचे अवास्तव तास आणि सेल्सचे (विक्रीचे) आक्रमक लक्ष्य गाठण्यासाठी दिला जाणारा प्रचंड दबाव, यामुळे त्रस्त होऊन त्याने हा निर्णय घेतला. "लंच ब्रेकसाठी केवळ १५ मिनिटे मिळायची," असे सांगत त्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील या भयावह वास्तव जगासमोर मांडले आहे. त्याच्या या अनुभवामुळे सध्या सोशल मीडियावर टॉक्सिक कार्यसंस्कृतीबाबत चर्चा रंगली आहे.

'९ ते ५' च्या नोकरीचे रूपांतर '९ ते ७' मध्ये ....

बँकिंग क्षेत्रात वार्षिक १७ लाख रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या चिराग मदानने कामाच्या अतिव्याप्त दबावामुळे अखेर नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. चिरागने आपला अनुभव इन्स्टा पोस्टमध्ये शेअर करताना सांगितले की, सुरुवातीला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असलेली त्याच्या कामाची वेळ हळूहळू संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ताणली गेली. केवळ कामाचे तास वाढले नाहीत, तर आठवड्यातून पाच दिवस असणारे काम सहा दिवसांवर गेले. कामाचे वाढलेले स्वरूप आणि वैयक्तिक आयुष्यावर होणारा त्याचा परिणाम सुरू झाला.

लंच ब्रेकसाठी केवळ १५ मिनिटे... १० कोटींचे टार्गेट

कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीवरही कमालीचे निर्बंध होते. कामाचा व्याप इतका प्रचंड होता की, कर्मचाऱ्यांनी अवघ्या १० ते १५ मिनिटांत आपले जेवण उरकावे, अशी व्यवस्थापनाची अपेक्षा असे. केवळ कामाचे तास किंवा जेवणच नाही, तर आजारपणामुळे रजा मिळणे अवघड होते; कारण प्रत्येक रजेसाठी कर्मचाऱ्यांना सविस्तर स्पष्टीकरण आणि पुरावे सादर करावे लागत. कर्मचाऱ्यांवर १० कोटी रुपयांपर्यंतचे मोठे व्यवहार पूर्ण करण्याचा अतोनात दबाव असायचा. जर एखादे 'टार्गेट' पूर्ण झाले नाही, तर केवळ मानसिक त्रास दिला जात नसे, तर कामगिरीच्या अपेक्षांचे ओझे लादून कामाचा ताण सातत्याने वाढवला जात असे, असेही चिरागने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

बँकिंग क्षेत्रातील 'मिस-सेलिंग'वर उपस्थित केले प्रश्न

चिरागने पुढे बँकिंग प्रणालीतील 'मिस-सेलिंग' (चुकीच्या पद्धतीने उत्पादनांची विक्री करणे) सारख्या गंभीर समस्यांवरही प्रकाशझोत टाकला आहे. त्याने एका घटनेचा दाखला देताना सांगितले की, एकदा एक ग्राहक त्याच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील त्रुटी घेऊन आला होता; या चुका कथितरित्या पूर्वीच्या बँक व्यवस्थापकाने आपल्या फायद्यासाठी केल्या होत्या. चिरागने मांडलेल्या या व्यथेमुळे सध्या इंटरनेटवर कॉर्पोरेट क्षेत्रातील 'वर्क-लाईफ बॅलन्स' आणि तरुण व्यावसायिकांना सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक दबावावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

चिरागच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनुभवांचे शेअरिंग

चिरागच्या या पोस्टवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी देखील काही महिन्यांपूर्वीच अशाच कारणांमुळे नोकरीचा राजीनामा दिला. बँकिंग क्षेत्रात 'मिस-सेलिंग'चे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ग्राहकांच्या कष्टाच्या कमाईचा कोणताही विचार न करता केवळ टार्गेट पूर्ण करण्यावर भर दिला जातो. अनेकदा ग्राहकांनाही त्यांच्या गुंतवणुकीच्या तांत्रिक बाबींची पुरेशी माहिती नसते, ज्याचा गैरफायदा घेतला जातो. विशेषतः मार्चअखेरच्या काळात तर हा दबाव शिगेला पोहोचतो, ज्यामुळे बँकिंग क्षेत्राची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे." एकाने नमूद केले आहे की, हे बँकिंग क्षेत्रातील अत्यंत 'काळे वास्तव' आहे. तर अन्य एका माजी कर्मचाऱ्याने आपला अनुभव मांडताना सांगितले, "मी सुद्धा वयाच्या २३ व्या वर्षी बँकेतील नोकरी सोडली. सध्या मी एका बॅकएंड विभागात कार्यरत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा ताण आणि 'टॉक्सिक' कल्चर तिथेही आहेच; पण निदान मला माझ्या तत्त्वांशी तडजोड करून ग्राहकांची फसवणूक (मिस-सेलिंग) तरी करावी लागत नाही, याचे समाधान आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT