हैदराबाद : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा आर्थिक फटका बसल्याने डोक्यावर झालेले चार कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी एका गुंतवणूकदाराने शेजारी राहणाऱ्या महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मीरपेट येथील धातू नगर परिसरात बुधवारी ही घटना घडली.
अनिता अरुण कुमार (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून, त्या 'मिश्र धातू निगम लिमिटेड'चे उपमहाव्यवस्थापक अरुण कुमार वेणुगोपाल यांच्या पत्नी होत्या. या प्रकरणी पोलिसांनी राज कुमार (वय ४४) या शेअर बाजारातील गुंतवणूकदाराला गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेले २१ तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण कुमार हे दररोज सकाळी त्यांच्या ११ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांना शाळेत सोडत असत, तर सायंकाळी अनिता मुलांना घरी घेऊन येत असत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८.२० च्या सुमारास अरुण मुलांना शाळेत सोडून कामावर गेले. मात्र, सायंकाळी शाळा सुटल्यानंतरही अनिता मुलांना घेण्यासाठी न आल्याने दोन्ही मुले स्वतःहून घरी परतली. घरी आल्यानंतर त्यांना बेडरूममध्ये आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. घाबरलेल्या मुलांनी तातडीने आईच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. अरुण यांनी तातडीने घरी धाव घेत अनिता यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मीरपेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासात आरोपीने घरात घुसून अनिता यांचे तोंड दाबले आणि त्यांच्या डोक्यावर इस्त्रीने जोरदार प्रहार केल्याचे समोर आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे, तर डोक्यावर प्रहार केल्यानंतर आरोपीने इस्त्रीच्या वायरने त्यांचा गळा आवळण्याचाही प्रयत्न केला होता. खून केल्यानंतर आरोपीने घरातील सोन्याच्या बांगड्या, अंगठी आणि चेन असा एकूण २१ तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला.
पोलिसांनी सोसायटी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच, शेजाऱ्यांकडेही चौकशी सुरू केली. तपासाची चक्रे अनिता यांच्या फ्लॅटच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या राज कुमार याच्याकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "शेअर बाजारातील नुकसानीमुळे राज कुमारवर तब्बल चार कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने चोरीचा कट रचला. बुधवारी दुपारी अनिता घरात एकट्याच असल्याची आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यही बाहेर गेल्याची संधी साधून त्याने हा गुन्हा केला," अशी माहिती मीरपेटचे पोलीस निरीक्षक बी. शोभन यांनी दिली. गुरुवारी शवविच्छेदनानंतर अनिता यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.