पुढारी ऑनलाईन डेस्क : सात महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीने चारित्र्याच्या संशयातून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या गळ्यात लॉकेट घालण्याच्या निमित्ताने पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर तिच्यावर धारदार शस्राने २० वार करून तिची निर्दर्यीपणे हत्या केली. या क्रूर हल्ल्यात पत्नीसह तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अमेडा गावात घडली. पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर निर्दयी पतीने स्वत: पोलिसांशी संपर्क साधत पत्नीच्या हत्येची माहिती दिली. या घटनेने अमेडा गावातील भवनपूर गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमेडा गावातील भवनपूर येथील रहिवासी रविशंकर याचे सपना हिच्याबरोबर जानेवारीमध्ये लग्न झाले होते. काही दिवसांपासून रविशंकर तिच्या चरित्र्यावर संशय घेत होता. या कारणातून दोघांमध्ये खटके उडत होते. सात महिन्याची गर्भवती असणाऱ्या सापनाशी रविशंकर याचे आठ दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यानंतर ती नाराज होऊन ममता या मोठ्या बहिणीच्या घरी आली. त्यानंतर त्याने पत्नीची माफी मागून तिची समजूत काढत तिला परत सासरी नेले.
घरी आणल्यानंतर रविशंकरने शनिवारी (दि. ३) सपनासाठी एक खास गिफ्ट आणल्याचे सांगितले. त्यानंतर तिला डोळे बंद करण्यास सांगितले. तिच्या गळ्यात लॉकेट घालण्याच्या निमित्ताने तिचा गळा चिरला व एका धारदार शस्राने तिच्यावर २० वार केले. त्यानंतर त्याने पोलिसांना स्वत: फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पतीला अटक केली असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
आई-बापाच्या मृत्यूनंतर सपनाचा संभाळ तिच्या मोठ्या बहीणीने केला होता. आपल्या मोठ्या बहीणीकडेच सपना राहत होती. त्यानंतर २३ जानेवारीला मोठी बहीण ममता हिने सपनाचे लग्न रविशंकर यांच्याशी लावून दिले.