हे प्रकरण महाभारत या महान महाकाव्याची आठवण करून देते. महाभारताची कथा आपल्याला एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचवते की, ज्या आक्रमकांनी भूमी आणि सत्तेसाठी आपल्याच नातेवाईकांचे रक्त सांडले. त्यांना त्यांच्या 'अधर्मा'बद्दल शिक्षा झालीच पाहिजे.
High Court on Death Sentence In Triple Murder Case
पाटणा : "जमिनीच्या एका लहान तुकड्यासाठी आरोपींनी तलवारींनी निशस्त्र लोकांची निर्घृणपणे हत्या केली आहे. या भयंकर गुन्ह्यामुळे तीन महिलांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांची मुले उघड्यावर पडली, त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत करत जसा महाभारतात अधर्माचा नाश झाला, सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच नातेवाईकांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा दैवी शिक्षा म्हणून अखेरीस दुःखद अंत झाला, तसाच येथेही गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणे अनिवार्य आहे, असे स्पष्ट करत पाटणा उच्च न्यायालयाने तिहेरी हत्या प्रकरणातील आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली. तसेच पीडित तिन्ही विधवा महिलांना नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.
'लाईव्ह लॉ'च्या रिपोर्टनुसार, बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील एका जमिनीच्या तुकड्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले होते. आरोपी अमन सिंग आणि सोनल सिंग यांनी तक्रारदाराच्या घराजवळील वादग्रस्त जमिनीवर नांगरणी सुरू केली होती. त्याला विरोध केला असता, आरोपींनी तलवारी आणि भाल्यांसह विजय सिंग, दीपक सिंग आणि राकेश सिंग यांचा पाठलाग केला. त्यांच्याच घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केली होती.
तिहेरी हत्या प्रकरणी आरोपी अमन सिंग आणि सोनल सिंग या दोघांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौरेंद्र पांडे आणि न्यायमूर्ती राजीव रंजन प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
उच्च न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, या प्रकरणात गुन्हा दाखल (FIR) करण्यासाठी नोंदवण्यास विनाकारण चार तास उशीर झाला आहे. पोलिसांनी फिर्यादीमध्ये वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न केला. एफआयआरच्या आधीच जप्तीची प्रक्रिया पार पडली होती, महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब घेतले नाहीत. या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. तसेच, डॉक्टरी पुराव्यांचा आधार घेत त्यांनी सांगितले की, शरीरावरील जखमा तलवारीने झालेल्या असू शकत नाहीत. "या तांत्रिक मुद्द्याचा वापर करून मृत्यूच्या वेळेबद्दलही शंका उपस्थित केली."
या प्रकरणी तपास अधिकाऱ्याने निष्पक्षपणे काम केले नाही. आरोपींना अनुकूल ठरेल अशा त्रुटी ठेवण्याच्या उद्देशाने त्याने 'जाणूनबुजून' काम केल्याचे दिसून येते. तपास अधिकाऱ्याने एएसआयचे जबाब नोंदवले नाहीत, तसेच त्याने जमिनीच्या मालकीची पडताळणीही केली नाही. आरोपींना फायदा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक काही पळवाटा सोडल्या आहेत, असे ताशेरेही उच्च न्यायालयाने ओढले.
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत खंडपीठाने स्पष्ट केले की, "तपास यंत्रणेच्या जाणीवपूर्वक केलेल्या चुकांचा किंवा त्रुटींचा फायदा आरोपींना देता येणार नाही."
न्यायमूर्ती सौरेंद्र पांडे यांनी न्यायमूर्ती राजीव रंजन प्रसाद यांच्या मताशी सहमत होत निरीक्षण नोंदवले की, हे प्रकरण त्यांना महाभारत या महान महाकाव्याची आठवण करून देते. महाभारताची कथा आपल्याला एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचवते की, ज्या आक्रमकांनी भूमी आणि सत्तेसाठी आपल्याच नातेवाईकांचे रक्त सांडले, त्यांना त्यांच्या 'अधर्मा'बद्दल शिक्षा झालीच पाहिजे. दैवी शिक्षा म्हणून अखेरीस दुःखद अंत येतो. या प्रकरणी जमिनीच्या एका तुकड्यासाठी केवळ तीन पुरुषांचा बळी गेला नाही, तर त्यांच्या पत्नींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि मुले आयुष्यभरासाठी अनाथ झाली आहेत."
आरोपींनी केवळ तीन मानवी जीवच घेतले नाहीत, तर तीन स्त्रियांचेही जीवन उद्ध्वस्त केले आहे. पती गमावलेल्या महिलांच्या मन आणि आत्म्यावर कधीही भरून न येणारी जखम झाली आहे, त्यांची मुले आयुष्यभर रडत राहण्यासाठी मागे राहिली आहेत. म्हणूनच मी अपीलकर्त्यांची शिक्षा कायम ठेवतो. मी सहमत आहे की हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे, असे स्पष्ट करत तिहेरी हत्या प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा न्यायमूर्ती सौरेंद्र पांडे आणि न्यायमूर्ती राजीव रंजन प्रसाद यांच्या खंडपीठाने कायम ठेवली.